जून २०२४ मध्ये मेजर जनरल रोज किंग यांनी न्यूझीलंडच्या लष्करी इतिहासात रचला आहे. त्या पहिल्या महिला चीफ ऑफ आर्मी म्हणून नियुक्त झाल्या आहेत. ही नेमणूक केवळ महिलांसाठी महत्वाची आहे असे नाही तर त्यांच्या उल्लेखनीय नेतृत्वकौशल्याची दखल घेतली आहे.
१९९१ मध्ये आर्मीमध्ये दाखल झालेल्या किंग यांनी तीन दशकांच्या सेवेत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. त्या न्यूझीलंड आर्मीतील ब्रिगेडियर पद मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. विविध लष्करी, धोरणात्मक आणि मानवतावादी जबाबदाऱ्यांत त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे, कोविड-१९ काळात न्यूझीलंडच्या क्वारंटाईन आणि आयसोलेशन व्यवस्थापन मोहिमेचे नेतृत्व त्यांनी यशस्वीरीत्या केले. या भूमिकेत त्यांनी त्वरित निर्णयक्षमता, धैर्य आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वय करण्यात कौशल्य दाखवले होते.
चीफ ऑफ आर्मी या पदापूर्वी त्यांनी डायरेक्टर ऑफ स्ट्रॅटेजिक कमिटमेंट्स आणि डेप्युटी चीफ ऑफ आर्मी अशी महत्त्वाची पदे सांभाळली. या पदांवरून त्यांनी संरक्षण धोरणांना दिशा देणे आणि न्यूझीलंडची लष्करी क्षमता मजबूत करणे यामध्ये मोलाचे योगदान दिले.
आज आर्मी चीफ म्हणून रोज किंग पॅसिफिक देशांसाठी वेगळ्या लष्करी धोरणांची गरज अधोरेखित करत आहेत. त्यांची नेमणूक केवळ महिलांसाठी प्रेरणादायी ठरली नाही, तर न्यूझीलंडच्या आर्मीला बळकट आणि सर्वसमावेशक भविष्य देण्याची खात्रीही देते.