भाजपच्या 4 महिला आमदारांना गंडा..

Update: 2022-07-19 07:20 GMT

पुण्यातल्या एका भामट्याने थेट भाजपच्या चार महिला आमदारांनाच गंडा घातला आहे. आतापर्यंत तुम्ही अनेकांची फसवणूक झाल्याचं वाचलं असेल किंवा पाहिला असेल पण थेट कुठल्यातरी आमदारालाच गंडा घातला असल्याचं तुमच्या कधीही ऐकिवात नसेल. आता आमदाराला कोण गंडा घालणार? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. मात्र पुण्याच्या एका भामट्याने एक नाही तर चार महिला आमदारांना चुना लावला आहे. तर या बहाद्दराने या महिला आमदारांना गंडवत आपल्या जाळ्यात कसं गुंतवलं पहा..

तर झालं असं होतं की, या चार आमदारांना मुकेश राठोड या व्यक्तीने आपली आई आजारी असल्याचं सांगत पैशाची मदत मागितली. सुरुवातीला त्याने या चारही महिला आमदारांचा संपर्क क्रमांक मिळवला त्यानंतर त्यांना संपर्क करून त्याने आईच्या आजारपणासाठी आर्थिक मदतीची मागणी केली. आणि त्याने त्यांच्याकडून हजारो रुपये उखळले.

फसवणूक झालेल्या या चार महिला आमदार कोण आहेत?

तर या भामट्याने भाजपच्या चार महिला आमदारांना चुना लावला आहे. यामध्ये चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ व जिंतूर मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे.

या भामट्याने या आमदारांना कसे फसवले?

हे प्रकरण नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आमदार मेघना बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. तर झालं असं होतं की, 14 जुलै रोजी एका व्यक्तीचा आमदार मेघना बोर्डीकर यांना कॉल आला होता. यावेळी त्या व्यक्तीने त्याची आई आजारी असून तिच्या उपचारासाठी पैशांची मागणी केली. दवाखान्यात मी स्वतः दोन लाख रुपये भरले असून मला आणखीन 36 हजार रुपयांची गरज असल्याचं त्याने सांगितलं. 14 तारखेला राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यामुळे या चारही आमदार एकत्र होत्या. एकाच दिवशी चौघींना पैशाची मागणी करणारा हा कॉल आल्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी त्या व्यक्तीस डॉक्टरांशी बोलणं करून देण्यास सांगितले. त्या व्यक्तीने डॉक्टर म्हणून दुसऱ्याच व्यक्तीचं बोलणं बोर्डीकर यांच्याशी करून दिलं. यावेळी त्यांनी त्याच्या आईला किडनीचा आजार असल्याचे सांगितले. या फ्रॉड डॉक्टरांने आईला किडनीचा आजार असल्याचे सांगितलं होतं मात्र त्या व्यक्तीने जी औषधाची चिठ्ठी पाठवली होती त्यावरती औषधा मात्र दुसऱ्याच आजाराच्या संबंधित होती. तर मग हा व्यक्ती फसवणूक करत असल्याचं बोर्डीकर यांना समजलं...

सध्या अशा प्रकारे बड्या लोकांना गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. काहीतरी अडचणीचा बहाना करायचा आणि मोठ्या लोकांकडून बक्कळ पैसे उकळायचे धंदे अनेक लोक करत आहेत. आता तर या बहाद्दराने थेट आमदारांनाच चुना लावला आहे.

Tags:    

Similar News