राज्यातील सर्वोत्कृष्ट महिला सरपंचाला मिळणार 'मीनाताई ठाकरे सर्वोत्कृष्ट महिला सरपंच पुरस्कार'!

Update: 2021-11-08 11:46 GMT

राज्यातील महिला सरपंचांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सरपंचाला आता राज्य शासनातर्फे पुरस्कार दिला जाणार आहे. 'मीनाताई ठाकरे उत्कृष्ट महिला सरपंच' या पुरस्काराची घोषणा राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये आज महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

या परिषदेमध्ये ग्राम विकासात महिला सरपंचाची भूमिका, गावाच्या विकासात महिला सरपंचाचे योगदान, सिंचन- जलजीवन मिशनसाठी महिलांचे कार्य, गावाच्या आर्थिक विकासाचे स्त्रोत आणि बळकटीकरण या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या महिला सरपंचांनी आपली भूमिका मांडली. त्यासोबतच ग्रामीण विकासात मोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, तज्ञ असलेल्या व्यक्तींनी राज्यभरातून आलेल्या महिला सरपंचांना मार्गदर्शन केलं.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सरपंचांना राज्य स्तरावरून चार पुरस्कार दिले जाणार आहेत. पहिल्या पुरस्काराची रक्कम ही २५ लाख रुपये असेल तर दुसऱ्या पुरस्काराची रक्कम ही २० लाख असणार आहे. तिसर्याी पुरस्काराची रक्कमही १० लाख रुपये असेल, ती रक्कम दोन महिला सरपंचांना विभागून दिली जाणार आहे.

राज्य स्तरासोबतच विभागीय आणि जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला सरपंचांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. ग्रामविकासात महिला सरपंचाचे योगदान वाढावे, यासाठी ही पारितोषिक योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News