नवनीत राणाच्या खाजेवर आमच्याकडे उपाय, किशोरी पेडणेकर भडकल्या

Update: 2022-05-08 09:41 GMT

 गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला खा. नवनीत राणा विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राणा दांपत्याला अटक झल्यानंतर हे सगळं शांत होईल असं वाटत असतानाच जामिनावर सुटलेल्या खासदार नवनीत राणा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं.

उद्धव ठाकरेंनी जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवावं. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल, असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना, "नवनीत राणा जे बोलल्यात ते हल्लाबोल नसून त्यांची खाज आहे", अशी टीका त्यांनी केली.

"नवनीत राणा जाणूनबुजून महाराष्ट्र आणि मुंबई अस्थिर करण्यासाठी, दंगल घडवण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. त्या बोलल्या ते हल्लाबोल नसून त्यांच्यातली खाज आहे. त्यांच्या वक्तव्याला हल्लाबोल म्हणणं म्हणजे त्या शब्दाचा अपमान आहे. आपले मुख्यमंत्री हल्लाबोल करण्यासारखे नाहीत. उद्धव ठाकरे हे त्यांच्या चांगल्या कामामुळे केवळ राज्यातच नाही तर देशातही अव्वल आले आहेत, ती खरी दोघांचीही पोटदुखी आहे, एकाचा भोंगा आहे तर दुसऱ्याचा सोंगा आहे आणि अॅम्प्लिफायर तर वेगळाच आहे," असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंनी जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवावं, असं आव्हान नवनीत राणांनी रविवारी दिलं होतं त्यावर देखील किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "तुझी लायकी तरी आहे का? लोकशाहीने अधिकार दिला म्हणून काहीही बोलायचं. खासदार आहात ना, मग त्याप्रमाणे तुमचं वर्तन असूदेत ना. नंतरचे जे फोटो आलेत त्यातली नासमज अजूनही आहे, असं वाटतंय. आम्हाला वाटलं होतं, बबली मोठी झाली, पण नाही बबली मोठी नाही झाली. बबली नासमझ है, मागचा अॅम्प्लिफायर लावला जातोय आणि ती खाज वाढतेय, पण त्या खाजेवर आमच्याकडे औषध आहे." अशा कठोर शब्दांमध्ये किशोरी पेडणेकर यांनी खासदार नवनीत रणांवर टीका केली आहे.

Tags:    

Similar News