नवनीत राणांच्या फोटोची पोलखोल; मनीषा कायंदे व किशोरी पेडणेकर थेट लीलावती रुग्णालयात

Update: 2022-05-09 09:00 GMT

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील विविध फोटो गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. रवी राणांसोबत, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्या सोबत एमआरआय कक्षातील देखील फोटोदेखील व्हायरल झाला होता. नेमका हाच एमआयआर कक्षातील फोटो राणांसोबतच रुग्णालय प्रशासनाला चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, आता या मुद्द्यावरून शिवसेनेच्या नेत्या प्रचंड आक्रमक झाल्या आहेत.

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, विधान परीषद सदस्य मनिषा कायंदे आणि इतर शिवसेना नेत्यांनी सोमवारी लीलावती रुग्णालयात जात तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. एखादा रुग्ण एमआयआर कक्षात जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टी बाहेर काढून ठेवायल्या सांगितल्या जातात. मग नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटोसेशनसाठी मोबाईल आतमध्ये कसा नेण्यात आला? यामुळे उद्या रेडिएशनमुळे स्फोट झाला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.

यावेळी शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद घेत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. एमआयआर कक्षात मोबाईल नेणे, ही तुम्हाला गंभीर बाब वाटत नाही का? तुम्हाला कोणी जाब विचारण्यापूर्वी तुम्ही या सगळ्याची विभागीय चौकशी का केली नाही? पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणतीही व्हीआयपी व्यक्ती असतो, रुग्णालयाचे नियम सगळ्यांना सारखे असतात. रुग्णालयांचा कारभार हा चॅरिटी कमिशनच्या नियमांनुसार चालतो. त्यामुळे तुमचे रुग्णालय खासगी असले तरी त्याठिकाणी सरकारी नियमांचे पालन झालेच पाहिजे. आम्ही असले प्रकार रुग्णालयात खपवून घेणार नाही, असं म्हणत विधान परीषद सदस्य मनिषा कायंदे यांनी रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

तर किशोरी पेडणेकर यांनीही रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. यामुळे रुग्णालयाचे नाव खराब होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही किती गांभीर्याने घेता हे आम्हाला माहिती नाही. तुम्ही रेडिऑलॉजी विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना आमच्यासमोर हजर करा. तुमच्या रुग्णालयात येऊन कोणीही काही करते आणि तु्म्हाला काहीही पडलेले नाही. नवनीत राणा यांना एमआयआर कक्षात फोटोसेशन करण्यापासून कोणी रोखले कसे नाही, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी विचारला. यावर रुग्णालय प्रशासनाने त्यांची चूक झाली असल्याचं मान्य केलं. ही चूक गंभीर आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण नवनीत राणा यांचा फोटो काढण्यात आला तेव्हा एमआयआर मशीन सुरु नव्हती, असे स्पष्टीकरण उपस्थित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं.

Tags:    

Similar News