देहविक्रय करणा-या महिलांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अन्नधान्य वाटप

महापालिका क्षेत्रातील ४,५०० महिला व तृतीय पंथीयांना रेशन किटचे वाटप

Update: 2021-05-04 15:29 GMT

मुंबई: देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र या काळात अनेक घटकांना आपल्या दैनंदिन गरजा भागविणे सुद्धा कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या नियोजन खात्याद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील देहविक्रय करणा-या महिला व तृतीय पंथीय यांना महिनाभर पुरेल एवढ्या अन्नधान्याचा समावेश असलेल्या रेशन किट वितरण करण्यात येत आहे.

या उपक्रमाची सुरुवात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) शसंजीव जयस्वाल, स्थानिक नगरसेवक जावेद जुनेजा यांच्या विशेष उपस्थितीत ना. म. जोशी मार्गावरील सावित्रीबाई फुले महानगरपालिका शाळेत नुकतीच करण्यात आली.

या उपक्रमातंर्गत विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने व महानगरपालिकेच्या पुढाकाराने सुमारे ४ हजार ५०० इतक्या महिला व तृतीय पंथीयांना विविध दैनंदिन गरजानुरुप अन्नधान्याचा समावेश असलेले किटचा पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती नियोजन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी निमित्ताने दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध परिसरांमध्ये सुमारे ४ हजार ५०० इतक्या संख्येने देहविक्रय करणा-या महिला व तृतीय पंथीयांचे वास्तव्य आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात या महिला व तृतीय पंथीयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेऊन विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अन्नधान्य किट वितरणाचा उपक्रम हाती घेतल्याना ह्या घटकांना दिलासा मिळणार आहे.

Similar News