जळगांव-बुलडाणा जिल्ह्यास "दुष्काळ ग्रस्त" घोषित करा; रक्षा खडसे यांची मागणी

Update: 2021-07-14 12:05 GMT

संपूर्ण महाराष्ट्रा राज्याप्रमाणे जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात हवामान अंदाज वेधशाळेने वर्तविल्या प्रमाणे कुठेही पाहिजे तसा पाऊस झालेला नसून, जून महिन्याच्या सुरवातीपासूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून टाकली होती. जुलै महिना उजाडला तरी सुद्धा अजून पावसाचे कुठल्याही प्रकारचे हवामान दिसत नाही. पावसाच्या आशेवर नाईलाजास्तव दुबार पेरणी करून पावसा अभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जळगांव व बुलडाणा जिल्ह्यास "दुष्काळ ग्रस्त" जिल्हे म्हणून घोषित करावे अशी मागणी भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडसे यांनी लिहलेल्या पत्रात म्हटलंय की, पेरणी करून टाकलेल्या शेतकऱ्यांचे आधीच पावसाअभावी आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेलेले आहे. आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकऱ्यांनी बँकेतुन कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिकांची लागवड केली होती. जळगांव व बुलडाणा जिल्हा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात काहीना काही पाऊस होत आहे. या पावसाच्या आशेवर पुन्हा तडजोड व उसनवारी करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली असून जुलै महिना अर्धाझाल्यावरही असून जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात पाहिजे तसा पिकांयोग्य पाऊस पडलेला नाही. पावसा अभावी दुबार पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीही येणार नाही असे वाटत आहे, असे खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.

तरी दुबार पेरणी करूनही पावसा अभावी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कडून जळगांव व बुलडाणा जिल्ह्यास "दुष्काळ ग्रस्त" घोषित करण्यात यावे अशी मागणी खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच जळगांव व बुलडाणा जिल्ह्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे.

Tags:    

Similar News