शिराळा तालुक्यातील मुलींच्या सोबतीला आदित्य बिरला यांची नात

ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. हीच समस्या लक्षात घेऊन या प्रश्नावर काम करण्यासाठी आदित्य बिर्ला यांची नात अद्वितेशा बिर्ला व यशस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेणुकादेवी देशमुख यांचा पुढाकार.

Update: 2022-03-09 09:06 GMT

आज आपण आधुनिकीकरणाकडे मोठ्या गतीने वाटचाल करत आहोत. शहरे मोठ्या झपाट्याने विकसित होत आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. ही गोष्ट जितकी आपणास कौतुकास्पद आहेच पण इतकं सगळं असताना दुसऱ्या बाजूला मात्र ग्रामीण भागातील महिला या सगळ्या प्रक्रियेत कुठे आहेत? आपण कितीही बोलत असलो तरीदेखील आजही ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या मोठ्या गंभीर आहेत. वारंवार या समस्यांवर बोललं जातं मात्र या समस्या दूर करण्यासाठी खरंच काम केलं जातं का? ग्रामीण भागातील महिला आजही अनेक गोष्टींपासून वंचित आहेत. याच गोष्टींचा विचार करून आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी काही खास उपक्रम राबवले जाणार आहेत.



 काल महिला दिनाचे औचित्य साधत सांगली जिल्यातील शिराळा या ठिकाणी निनाईदेवी शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत यशस्विनी फाउंडेशन व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट च्या उजास फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अद्वितेशा बिर्ला यांनी, ग्रामीण भागातील मुली व महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहे. शिराळा व आपसचा परिसर हा ग्रामीण व दुर्गम भाग असून ही गोष्ट लक्षात घेऊन या तालुक्यातील मुली व महिलांच्या आरोग्याबाबत काळजी व त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम केलं जाणार आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्यदायी योजना सुद्धा राबवणार असल्याचे अद्वितेशा बिर्ला यांनी सांगितले.


 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेणुकादेवी देशमुख होत्या. यावेळी बोलताना त्यांनी ''या विभागातील महिलांना कष्ट करून आपले कुटुंब सांभाळावे लागते अशा परिस्थितीत महिलांना व मुलींना असणारे वेगवेगळे आजार लपवले जातात याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे अनेक अडचणी त्यांच्या समोर निर्माण होत असतात ही बाब लक्षात घेऊन व यशस्वीनी फाउंडेशनने महिलांसाठी काम सुरू केले आहे. यापुढील काळात महिलांच्या आरोग्यविषयक सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.


यावेळी भाजपचे नेते सत्यजित देशमुख यांनी अद्वितेशा बिर्ला यांना सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देत त्या करत असलेल्या कामाचे स्वागत केले. 




Tags:    

Similar News