धक्कादायक! ओला कार चालक पतीची पत्नीनेच घडवून आणली हत्या

घटस्फोट देत नसल्याने पत्नीनेच प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार भिवंडीतून समोर आला आहे. या प्रकारने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Update: 2021-08-05 12:53 GMT

भिवंडी // मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना 1 ऑगस्टला समोर आली होती. या घटनेनंतर पत्नीच्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलीस तपासात खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी पती घटस्फोट देत नसल्याने, रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचून दोघा जणांना एक लाख रुपयांची सुपारी देत ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून मयत प्रभाकर व पत्नी श्रुती या दोघांचेही अनैतिक विवाहबाह्य संबंध होते. त्यातून पत्नी श्रुती हिने प्रियकर नितेश गोवर्धन वाला या सोबत विवाह करण्यासाठी आपल्या पती कडे घटस्फोटासाठी तगादा लावला होता. मात्र, पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने आपली मैत्रीण प्रिया निकम हिला दिली. प्रिया निकम हिचा देखील घटस्फोट झाला असल्याने तिने श्रुती हिला पतीची हत्या करून काटा काढण्याचा सल्ला दिला. त्यासाठी आपल्या ओळखीचे दोन युवक असल्याचे सांगितले. त्यांनतर पत्नी श्रुती हिने स्वतः कडील दागिने गहाण ठेवून एक लाख रुपयांची सुपारी हत्या करणाऱ्या दोघा जणांना दिली.

दरम्यान हत्येची सुपारी घेतलेल्या व्यक्तींनी 31 ऑगस्टच्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाईल वरून संपर्क साधाला आणि रात्री दहा वाजता कार बुक केली, त्यानंतर प्रवासात मानकोली येथे त्या दोघा मारेकऱ्यांनी गळा आवळून प्रभाकरची हत्या केली आणि मृतदेह कारमध्येच ठेवून पसार झाले.

या गुन्ह्याचा तपास नारपोली पोलीसांसह गुन्हे शाखा ठाणे हे एकत्रित करीत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात फिर्याद देणारी पत्नी श्रुती हीच मुख्य आरोपी असल्याचे उघड झाले. श्रुती, तिचा प्रियकर नितेश गोवर्धन वाला व मैत्रीण प्रिया सुहास निकम यांना पोलिसांनी अटक केली असून, हत्या करणारे दोघे जण फरार झाले आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:    

Similar News