महाराष्ट्राचं House Of Secrets : एकाच घरातील ९ जणांची आत्महत्या… पण का?

Update: 2022-06-20 11:25 GMT

राज्याला हादरा देणारी घटना सोमवारी सांगली जिल्ह्यामध्ये घडली आहे. एकाच घरातील तब्बल ९ जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १५ वर्षांच्या मुलापासून ७२ वर्षांच्या आजींचा समावेश आहे.

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. आत्महत्या केलेले दाम्पत्य डॉक्टर आहे. त्यांच्या घरातील नऊ जणांनी एकाचवेळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह आढळले आहेत. या कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

म्हैसाळ येथील नरवाड रोडजवळ असलेल्या अंबिका नगर चौकालगत मळ्यामध्ये डॉक्टर वनमोरे हे कुटुंबासह राहत होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे आणखी एक घर होते. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. संशय आल्यानंचतर आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जणांचे मृतदेह आढळले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Tags:    

Similar News