कशाला उद्याची बात?

Update: 2019-05-22 18:22 GMT

'आता कशाला उद्याची बात?' असं मी नाही, शांता हुबळीकर यांनी म्हणून ठेवलंय! माणूस' चित्रपटातलं हे गाणं जरा जुनंच, पण आशयपूर्ण आहे. मात्र ते आज आठवण्याचं कारण म्हणजे उद्याच्या निकालाची पार्श्वभूमी ! जो तो फक्त उद्याबद्दल बोलतोय ! उद्याच्या निकालाने देशात बराच गदारोळ होणारे म्हणे! पण लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात काय फरक पडणारे? निवडून आलेल्या राज्यकर्त्यांनी चांगले काम केले तर निश्चित फरक पडेल, मात्र तोपर्यंत आपलं गाडं आपल्यालाच ओढायचं आहे.

शालेय जीवनात परीक्षा सुरू असताना फार फार टेन्शन यायचं. एक पेपर झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा...! मध्येच एखादी सुटी मिळाली, तर थोडे हायसे वाटायचे, अन्यथा एकामागोमाग एक पेपर देऊन नुसती धाप लागायची. पेपर चांगले गेले तर ठीक, नाहीतर गुणांची जुळवणी करत भविष्याचे आराखडे मनात तयार करायचे. स्वयंघोषित एक्झिट पोलने ३५ चा आकडा पार केला तरी हायसे वाटे, मात्र अंतिम निकालाच्या विचाराने धाकधूकही वाटे. असेच एकदा माझ्या मनाने ३५ चा काठही गाठू शकणार नाही असा कौल दिला आणि मी घरी येऊन ढसा ढसा रडायला लागले. बाबांनी समजूत काढली, पण माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं. नापास होणार या भीतीने रडण्यात अर्ध्याहून अधिक दिवस वाया घालवला होता. शेवटी संध्याकाळी बाबा थोडे रागाच्या सुरातच म्हणाले, 'आजचा पेपर वाईट गेला, तसा उद्याचाही घालवायचा आहे का? नाही ना? मग उठ आणि उद्याच्या पेपरच्या तयारीला लाग. दुःख करत बसण्यात मी कितीतरी वेळ वाया घालवला, याचं भान आलं आणि मी तोंड धुवून लागलीच अभ्यासाला बसले. कालांतराने निकाल लागला. भीतभीतच प्रगती पुस्तक हाती घेतलं आणि चमत्कार झाला. ज्या विषयात नापास होईन अशी भीती वाटलेली त्यात १०० पैकी ५० मार्क मिळाले होते आणि बाकीच्या विषयांनी माझी नौका तारली होती. पण तेच जर मी दुःख कुरवाळत बसले असते तर...?

भूतकाळात नाहीतर भविष्यकाळात रमणे हा मनुष्य स्वभावच आहे. पण त्या विचारात आजचा वर्तमान आपण गमावतोय, याची भ्रांत राहत नाही. त्यामुळे आजचा वर्तमान भूतकाळात जमा होतो आणि येणारा भविष्यकाळ बिघडतो. केवळ उद्याच्या निकालाबद्दल हे म्हणत नाहीये, तर एकूणच आपलं आयुष्य, उद्याची काळजी करण्यात वाया जात आहे. जे घडायचं, ते घडणारच आहे, म्हणून आपण ना प्रयत्न सोडायचे ना काळजी करायची. आपण आपलं काम चोखपणे करत राहायचं. आणि कोणी विचारलंच तर त्यालाही सांगायचं, 'कशाला उद्याची बात, बघ उडून चालली रात!'

-भैरवी

 

 

Similar News