आणि आत्महत्या करणाऱ्या तिला वाचवण्यात मला यश आलं...

आपल्या आयुष्यात कोणती व्यक्ती कोणत्या हेतुने येईल हे सांगता येत नाही. कुणी मदत हवी म्हणुन येतं, कुणी प्रेमापोटी येतं तर कुणी आपलं नुकसान करण्यासाठी येतं. एखादी व्यक्ती स्वतःहुन नाही पण आपल्या आयुष्यात येते खरी... अशीच एक महिला अश्विनी वेताळ यांच्या आयुष्यात आली आणि त्या महिलेचा जीव वाचला! कसा ते वाचा अश्विनी वेताळ – पाटील यांच्याच शब्दांमध्ये.....

Update: 2022-05-23 10:14 GMT

 २४ वर्षीय महिला, BSC शिक्षण झालेल, वडिल नाहीत, आई अपंग, आजीने रोजगार करुन तिला सांभाळलं शिकवलं. शिक्षण झाल्यानंतर तिने पुणे येथे काही दिवस जॉब केला. कॉलेज संपल्यानंतरच एका मुलासोबत तिची ओळख झाली ओळखीच रुपांतर प्रेमात झालं.त्यानंतर तिने प्रेमविवाह केला. दोघांनीच नरसोबाच्या वाडीला जाऊन कोणालाही न सांगता लग्न केलं. लग्न केलंय हे दोघांनीही त्यांच्या घरी नाही सांगितलं. तिचा नवराही पुणे येथे जॉब करत होता. लग्न केलं व तो गावी जाऊन शेती करु लागला.

त्यानंतर १ वर्षांनी अचानक या महिलेच्या नवऱ्याने तिला गावी बोलावुन घेतल व घरी लग्नाची पुजा घातली व महिला तिचा पुण्यातील जॉब सोडुन सासरी राहु लागली. त्यादरम्यान काही महिने उलटुन गेल्यानंतर सासु, सासरे, नवरा तिचा मानसिक छळ करु लागले. महिलेच्या माहेरहुन तिची आजी भेटायला आली तर त्यांचा अपमान करणं वगैरे प्रकार चालु झाले. (हि महिला तशी स्वभावाने शांतच आहे व समजुतदारपणा तिच्यात आम्हाला दिसला.) सारखे वाद होतायत म्हणून महिला आजीकडे जाऊन ९ महिने राहिली. त्यादरम्यान सासरहुन तिला कोणीही न्यायला आलं नाही. उलट मुलीचे मामा सासरच्या लोकांना विनंती करायला गेले तेव्हा महिलेच्या मामांना मारहाण केली. मग आजीनेही रोजगार करुन तिला सांभाळलं.

समुपदेशन केंद्राच्या माध्यमातुन पुन्हा ह्यांच्यामध्ये चर्चा घडुन आली व हि महिला नंतर सासरी नांदायला गेली. पुन्हा काही दिवसांनी ती गरोदर राहिली व तीला १ छानशी, गोंडस मुलगी झाली. माहेराहुन आजीला, भावाला भेटण्यास सासुने साफ नकार दिला. सततचा त्रास घालुनपाडुन बोलणं, मानसिक, शारिरीक त्रास हा तिला चालुच होता. त्यात तिचा नवराही तिला साथ देत नव्हता. तिला सारखं घरातच ठेवलं जायचं. बाहेर कुठे पडू दिलं जात नव्हतं. त्यामुळे महिला हॅरॅस झाली होती. दि. २१ मे रोजी तर तिच्या ६ महिन्याच्या बाळाला तिच्या सासुने व नवऱ्याने तिला घेऊही दिलं नाही. महिलेला ३ वेळा पान्हा फुटला पण बाळाला पाजुही दिलं नाही. बराच मानसिक छळ तिचा केला व यामुळे महिला प्रचंड मानसिक तणावात गेली व घरातुन बाहेर पडली.

कराडला पोहचली व ती कराड परिसरात मानसिक तणावात फिरत होती. तिने ठरवलेलच कि आता विहिरीत उडी मारुन स्वत:ला संपवायच पण वेळीच मला ती भेटली व पुढचा अनर्थ टळला. तिला आपल्या शांताई फाऊंडेशनच्या आधारगृहात आणलं. तिच्या डोक्याला कपाळाला डोक आपटल्यामुळे सुज आली होती व ती सुज पुर्ण डोळ्यावरती उतरलेली व हळुहळु तिला दिसायला कमी येऊ लागलेलं. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमीट केलं. एक्सरे वगैरे सर्व टेस्ट केल्या सलाईन लावले. औषध चालु केली त्यानंतर तिला बर वाटलं.

यादरम्यान तिच्या घरच्यांनी तिची मिसिंग केसही दाखल केली होती. ती जिथुन आली होती त्या स्थानिक पोलिस स्टेशनच्या PI भोपळे साहेबांना या सर्व प्रकाराची मी मोबाईलवरुन माहिती दिली. त्यानंतर PSI व कॉन्स्टेबल, महिला पोलिस हे सर्व आपल्या शांताई आधारगृह बनवडी येथे आले व त्या महिलेचा रितसर जबाब नोंदवला. यादरम्यान महिला सारखी म्हणत होती. मला पान्हा फुटतोय, मला माझ्या बाळाला नवऱ्याला आणायला सांगा. म्हणून सतत रडत होती. पण पहिल्यांदा तिचा नवरा बाळाला घेऊनच आला नव्हता व बाळाला त्याच्या आईला भेटण्यास नकार देत होता. नंतर मी थोडी त्यामध्ये माझ्या स्टाईलमध्ये भुमिका घेतली व त्या ६ महिन्याच्या बाळाला त्याच्या आईजवळ आणुन दिले. ते जेव्हा बाळ त्याच्या आईला भेटलं तेव्हा खुप आनंदी झालं. आम्ही सर्वजण क्षणभर स्तब्ध होऊन त्या मायलेकीकडे पाहतच राहिलो.

आता ४ दिवस या महिलेस आराम कर व शांत होऊन पुढचा विचार कर नंतर आपण तिच्या सासरच्या लोकांना बोलावुन समुपदेशनाच्या माध्यमातुन या समस्येवरती नक्कीच मार्ग काढुन तिचा संसार व्यवस्थित चालावा, संसार वाचावा यासाठी प्रयत्नशील असेन...

(मला अस वाटत हल्ली बर्याचदा चर्चा असते मुली सासरी सांभाळुन घेत नाहीत पण सासरच्याही लोकांनी सुनेला आपली मुलगी म्हणून वागवलं पाहिजे प्रत्येक वेळी सासरी नांदत असणारीच मुलगी चुकते असं नाही,असं असतं तर सासरवासनीवरती आत्महत्या करन्याची वेळच आली नसती)

या सर्व प्रकरणात मला आमच्या संस्थेच्या MSW समुमदेशक सायली कुलकर्णी,तसेच पोलिसांचे खुप सहकार्य मिळाले.

मला अभिमान आहे कि,मी एका महिलेला आत्महत्या करन्यापासुन रोखवलं व मायलेकींना भेटवलं.

आपलीच- अश्विनीताईं

शांताई फाऊंडेशन आधारगृह कराड

या लेखानंतर आम्ही अश्विनी वेताळ – पाटील यांच्याशी संपर्क साधून त्या महिलेची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी ती महिला सध्या उपचार घेत असून तिला बरं वाटलं की तिच्या सासरच्यांना बोलावून त्यांचं समुपदेशन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Tags:    

Similar News