महिलांच्या बदलत्या मानसिकतेचे धक्कादायक रूप
तरुण मुलींच्या वागण्यात वाढती हिंसक प्रवृत्ती चिंताजनक
छत्तीसगडमधील दुर्ग शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात घडलेली अॅसिड आणि ब्लेड हल्ल्याची घटना संपूर्ण समाजाला हादरवून गेली आहे. दोन महिलांनी आणि दोन अल्पवयीन मुलींनी शेजाऱ्यांवर केलेला अचानक आणि अकल्पित हल्ला केवळ एक गुन्हा नाही, तर बदलत्या सामाजिक वास्तवाचे, वाढत्या नशेखोरीचे आणि तरुणाईतील अस्थिरतेचे चिंताजनक प्रतिबिंब आहे.
काही दिवसांपासून या घरात बाहेरचे लोक येणे-जाणे, अमली पदार्थांचे सेवन, आणि परिसरातील मुलांवर होणारा त्याचा परिणाम या कारणांनी स्थानिक नागरिक त्रस्त होते. शेवटी एका रात्री काही रहिवासी मुलींना शांतपणे समजावण्यासाठी गेले. पण साधं संभाषण काही क्षणांतच भयावह हिंसाचारात बदललं. मुली रागाने घरात धावत गेल्या आणि हातात ब्लेड आणि टॉयलेट क्लिनरमधील अॅसिड घेऊन परत आल्या. त्यांनी एकही इशारा न देता अॅसिड शेजाऱ्यांच्या चेहऱ्यावर फेकले. काहींची दृष्टी बाधित झाली, काहींच्या चेहऱ्यावर खोल जखमा झाल्या आणि त्यानंतर ब्लेडने वार करत दगडफेकही करण्यात आली. अरुंद गल्लीत टाहो, धावपळ आणि दहशत पसरली.
घटनानंतर असंतोषाचा उद्रेक झाला. रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी दुर्ग सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गर्दी करून त्वरित कारवाईची मागणी केली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून दोघी विद्यार्थी आहेत तर दोघी महिला नोकरदार आहेत, असेही स्पष्ट केले. मात्र, प्रश्न एवढाच नाही की या चार मुलींनी हिंसा का केली; प्रश्न हा आहे की समाजात अशी परिस्थिती निर्माण होतेच का?
ही घटना नशेच्या वाढत्या वापराकडे स्पष्टपणे बोट दाखवते. शहरांमध्ये आणि लहान वस्त्यांमध्येही ड्रग्सची उपलब्धता पूर्वीपेक्षा सोपी झाली आहे. नशेचा प्रभाव मानसिक संतुलन घालवतो, निर्णयक्षमता कमी करतो आणि आक्रमकता वाढवतो. आजच्या युवकांमध्ये टीकेची सहनशीलता कमी झाली आहे, संवादाची हरवला आहे आणि तात्काळ उग्र प्रतिक्रिया वाढू लागल्या आहेत. त्यामुळे एखादे साधे समजावणेही त्यांना अपमानकारक वाटते आणि त्याचे हिंसेत रूपांतर होते.
छत्तीसगड दुर्गमधील ही घटना आणखी एका मोठ्या बदलाकडे लक्ष वेधते. पूर्वी महिलांमध्ये दिसणारी भावनात्मक सहनशीलता, सामाजिक भीती आणि स्वतःच्या वर्तनाबद्दलची खबरदारी काही वेळा पूर्णपणे विरघळत चालली आहे. महिलांना स्वावलंबन आणि अधिकार मिळणे हे समाजासाठी प्रगतीचं चिन्ह आहे; परंतु गेल्या काही वर्षांत या स्वातंत्र्याची समज काही ठिकाणी धोकादायक पद्धतीने बदलत आहे. “कोणी मला प्रश्न विचारू नये”, “मी जे करते तेच बरोबर”, “कोणी हस्तक्षेप केला तर प्रत्युत्तर देणारच” अशी मानसिकतेने अनेक तरुण मुली वागू लागल्या आहेत. समाजप्रणीत बंधनांचा दबाव कमी झाला, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव आणि स्वनियंत्रण हेसुद्धा कमी होत चालले आहे.
मुलींना वाटू लागले आहे की विरोधाला प्रतिवादाने नव्हे, तर टोकाच्या प्रतिक्रिया देऊनच थांबवता येते. ही अति-प्रतिक्रिया संस्कृती सोशल मीडियाच्या जलद आणि अस्थिर जगातून जन्म घेत आहे. ऑनलाइन व्हिडिओ आणि कंटेंटमध्ये ‘धाडसी’ व ‘सामाजिक नियम मोडणाऱ्या’ मुलींना शाबासकी मिळते. पण प्रत्यक्ष जीवनात त्या आक्रमकतेचा अनियंत्रित होते आणि दुर्गमधील घटना त्याचेच एक अत्यंत तीव्र उदाहरण आहे.
मुलींना आज स्वतःच्या सुरक्षिततेसाठी लढावे लागते ही कटू वास्तवता आहे. पण काही ठिकाणी हा संघर्ष चुकीच्या दिशेला वळतो, जिथे प्रत्येक बोलणं ‘हल्ला’ वाटू लागतो. स्थानिक शेजाऱ्यांनी केलेल्या विनंतीलादेखील मुलींनी “आमच्या जीवनात हस्तक्षेप” म्हणून पाहिले, आणि तिथून हिंसा सुरू झाली. अशा प्रतिक्रिया म्हणजे अनियंत्रित भावना, नशेचा प्रभाव आणि अति-स्वत:केंद्रित दृष्टिकोन यांच्या एकत्रित परिणामाचे धक्कादायक स्वरूप आहे.
या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट दिसते महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना कधीही कसाही वागण्याचा मिळालेला अधिकार नव्हे तर त्यात जबाबदारी, भावनिक संतुलन आणि सामाजिक भान या तिन्ही गोष्टींची घट्ट जोड आवश्यक असते. स्वातंत्र्य आणि अनुशासन यांच्यामधला समतोल बिघडला, तर स्वातंत्र्यही हिंसेच्या मार्गाला पोहोचू शकते.
दुर्गमधील हल्ला ज्या प्रकारे अचानक घडला, त्याने एक प्रश्न पुन्हा उभा केला आहे जर तरुण मुलींमधील ही मानसिकता योग्य वेळी समजून घेतली नाही, तर येणाऱ्या काळात ‘स्वातंत्र्य’ आणि ‘उन्माद’ यांच्या सीमारेषा पूर्णपणे पुसल्या जातील आणि त्याचे परिणाम फक्त एका शहरापुरते मर्यादित राहणार नाहीत.