पुणेकरांची लाडकी 'भीमथडी जत्रा' दिमाखात सुरू!

पुण्यात खासदार सुनेत्राताई पवार, यांच्या हस्ते भीमथडीचे उदघाटन

Update: 2025-12-20 10:05 GMT

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी भीमथडी जत्रा आजपासून पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाली.

या वेळी भीमथडी जत्रेच्या आयोजक मा. सुनंदाताई पवार, मा. रजनीताई इंदुलकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉ दिगांबर दुर्गाडे, महात्मा फुले कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माने, मा. सई ताई पवार, मा. कुंती ताई पवार, ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे सी इ ओ मा निलेश नलावडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा सुनील चांदेरे, कार्यकारी अध्यक्ष मा अरुण देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी जवळपास 40 पेक्षा जास्त ढोल वादकांनी ढोल वाजवून या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

देशी फुले ही भीमथडीची थीम असल्याने भीमथडीत जवळपास 30 पेक्षा जास्त देशी फुलांची रोपे पुणेकरांसाठी प्रसिद्ध मुघल गार्डनच्या धर्तीवर मांडलेली आहेत. त्या मध्ये बारमासी मोगरा, मोती मोगरा, कुंद, कागडा, जुई, बोगणवेल, जास्वंद, कण्हेर, आनंत, रातराणी , गणेशवेल, तुळस, टणटनी, शेवंती, कर्दळ, झेंडू, गुलाब, बटन गुलाब, संक्रात वेल, तेरडा, फाउंटन ग्रास, सोनचाफा, पारिजात, थाई कुंद, हळदी कुंकू टनटणी, झिनिया, कॉसमॉस, अबोली, निळे व जांभळे कृष्णकमळ, काश्मिरी गुलाब इत्यादी इत्यादी प्रकारची फुलरोपे लक्ष वेधून घेतात.

दरम्यान आज भिमथडीला आमदार रोहित पवार, सकाळ उद्योग समूहाचे मा. प्रतापराव पवार आदी मान्यवरांनी भेट दिली.

भीमथडीत या वर्षी ऑनलाईन तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने तिकीट काढण्यासाठी रांगेत थांबावे लागणार नाही. प्रशस्त प्रार्किंग आणि परतीच्या प्रवासासाठी स्वतंत्र रस्ता हे या वर्षीचे वेगळेपण आहे.

तसेच शेतकरी दालन, भीमथडी सिलेक्ट, स्वयंसिद्धा दालन, कला संस्कृती- आकर्षक रांगोळी व शाकाहारी- मांसाहारी पदार्थांची रेलचेल अशी भरगच्च भीमथडी पुणेकरांच्या भेटीला आलेली आहे.

या वर्षी भीमथडीत जेष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर उपलब्ध असून संपूर्ण भीमथडी जत्रा “नो प्लास्टिक झोन” असणार आहे. पाळीव प्राणी, जेष्ठ नागरिक व लहान मुलांनाही या वर्षी भीमथडीचा अनुभव घेता येईल. पुणेकरांचा उत्सव असलेल्या या भीमथडीला जास्तीत जास्त पुणेकरांनी भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

www.bhimthadijatra.com या वेबसाईटवर पुढील 5 दिवसाचे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.

Tags:    

Similar News