मॅक्सवुमन कशासाठी...

Update: 2019-03-07 21:37 GMT

विविध विषयांसाठी वाहिलेल्या अनंत वाहिन्या, वृत्तपत्रे, वेबपोर्टल अस्तित्वात आहेत. असावेळी मॅक्सवुमन हे स्वतंत्र पोर्टल कशासाठी असा प्रश्न पडणं साहजिक आहे. मला मात्र उलट प्रश्न पडला होता. इतकी सर्व माध्यमं आहेत, त्यात महिलांचं स्वतंत्र माध्यम का नसावं? महिलांची म्हणून जी माध्यमं आहेत ती एकतर जेंडर, रिसीपी किंवा शिवण-कढण, सौंदर्य यावरच केंद्रीत आहेत. काही माध्यमं महिलाविषयक बातम्यांना. मुद्द्यांना चांगलं स्थान देत असलं तरी ते बहुतांश पुरवणीच्याच स्वरूपात राहतं.

विविध भागांमध्ये फिरत असताना मला जाणवलं की, महिलांची जी स्थिती टिव्हीवर, वृत्तपत्रांमध्ये, चर्चांमध्ये दाखवली जाते त्यापेक्षा बरंच काही आहे, जे अजून माध्यमांपर्यंत पोहोचत नाहीय. राजकीय प्रक्रीयेत सहभाग, व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता, कला-साहित्य-संस्कृती, विज्ञान इतकंच काय घरगुती कामांमधलं कौशल्य. खूप छोट्या छोट्या कहाण्या आपल्या आसपास आहेत, पण त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. या सर्व 'मॅक्सवुमन' ना त्यांचं हक्काचं मुख्यप्रवाहातलं माध्यम उभं करता यायला हवं यासाठी ही छोटी सुरूवात आहे. गेल्या वर्षी महिला धोरणाची 25 वर्षे झाली, कुणाला कळलंही नाही. महिलांचे महत्वाचे विषय असेच दुर्लक्षिले जातात.

उजव-डावे, अती उजवे – अती डावे, हुकूमशाहीकडे झुकलेल्या ‘लोकशाही’ राजवटी असे विविध प्रवाह जगाने पाहिलेयत. या सर्व प्रवाहांचं नेतृत्व प्रामुख्याने पुरुषांकडे होतं-आहे. या सर्व प्रवाहांना जवळून पाहिल्यानंतर एक वेळ अशी येईल जेव्हा जग स्वत:हून महिलांकडे नेतृत्व सोपवेल. गंमत किंवा अतिशयोक्ती नाही, पण हा माझा विश्वास आहे.

याच ग्लोबल प्रक्रीयेतलं मॅक्सवुमन हे एक लोकल पाऊल आहे असं मला वाटतं.

-प्रियदर्शिनी हिंगे, संपादक, मॅक्सवुमन

Similar News