राधिका आपटे आणि सेक्स सीन -

Update: 2019-07-20 07:37 GMT

नेहमीप्रमाणे राधिका आपटेच्या आगामी "द वेडिंग गेस्ट" या सिनेमातला देव पटेलसोबतचा तिचा सेक्स सीन लीक झाला आणि लैंगिक सुखासाठी बुभुक्षित जनता गुगलवर, मेसेंजर ऍप्सवर तुटून पडली. राधिका आपटेबाबत हे पहिल्यांदा होत नाहीये. तिच्या "Parched" सिनेमातले आदिल हुसेनसोबतचे सीनही असेच लीक झाले होते. अनुराग कश्यपसोबत तिने केलेल्या कुठल्यातरी सिनेमातला (जो रिलीज झालाय की नाही हेही माहीत नाही) सीनही ज्यात राधिका समोरून पूर्ण नग्न आहे, तोही असाच लीक झाला. आता देव पटेलसोबतही तीच कथा.

वास्तविक पाहता हे सेक्स/न्यूड सीन खरंच लीक होतात की मुद्दाम केले जातात हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण एकाच विशिष्ट नटीसोबतच हे वारंवार व्हावे हा योगायोग मला तरी पटत नाही. भारतीय जनता ही सेक्ससाठी वखवखलेली आहे हे आपले गुगल सर्च सांगतात कारण दरवर्षी त्यात सनी लिओनी सगळ्यात जास्त सर्च केली जाते. राधिका आपटेचे सिनेमे तसेही मसालापट किंवा नायकप्रधान नसतात (अपवाद कबाली), त्यामुळे त्याला प्रेक्षकवर्ग तुलनेने कमी असतो. सबब असे लोकांची उत्कंठा वाढवणारे सीन लीक करणे हा प्रेक्षकांना थिएटरमध्ये ओढून आणायचा एक प्रयत्न असू शकतो.

आताच्या लीक झालेल्या सीनना ज्या पद्धतीने "Radhika Apte leaked video" असे सर्च केले गेले त्यावर राधिका आपटे म्हणते, "हे सगळे व्हिडीओ तिच्याच नावाने का शोधले जातात, देव पटेल किंवा पुरुष कलाकारांच्या नावाने का नाही? यावरून समाजाची विकृत मानसिकता कळते" वगैरे वगैरे. राधिकाचा हा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे पण आजवरचा इतिहास पाहता जगभरातली जनता ही असे सीन स्त्रीच्या संदर्भाने ओळखते आणि तिच्याचसाठी पाहते हाच अनुभव आहे.

पुरुषांच्या न्यूडीटीला म्हणावं तितकं गिऱ्हाईक नाही आणि त्याची कुणी दखलही घेत नाही. "अभय" मध्ये कमल हसनने, "PK" मध्ये अमीर खानने आणि एका सिनेमात नील नितीन मुकेशने सगळे कपडे उतरवून सीन केले म्हणून इंटरनेट, मीडिया किंवा लोक वेडे झाले नाहीत. "तनहा तनहा" गाण्यात उर्मिलासोबत जॅकी श्रॉफपण चड्डीवर होता, पण कुणी जॅकीला पाहून वेडे झाले नाही. GoT मधली न्यूडीटी बघताना खल ड्रोगोला नग्न पाहण्यात कुणालाच इंटरेस्ट नसावा, जितका खलिसीला पाहण्यात होता. प्लेबॉयचा जितका खप आहे त्याच्या 10% सुद्धा खप एखाद्या पुरुषांना नग्न दाखवणाऱ्या मॅगझीनचा नाही.

याच महिन्यात राधिका आपटेने नेहा धुपियाला एक मुलाखत दिलीय त्यात तिने बेधडकपणे सांगितले की तिला असे उत्कट सीन करताना तिच्या पुरुष सहकलाकारांबाबत बऱ्याचदा फिलिंग निर्माण झाल्या, आणि त्या नसत्या तर कदाचित ते सीन करताच आले नसते. राधिकाचा हा बेधडकपणा मला आवडतो. तिने आजवर पडदयावर दिलेल्या सेक्स सीनमधला बोल्डनेसही आवडतो. आणि तिचं अभिनयकौशल्य वादातीत आहे. हाच बोल्डनेस, बेधडकपणा आणि खरेपणा तिने लोक व्हिडीओ सर्च कसा करतात याबाबत प्रश्न उपस्थित करतानाही ठेवायला हवा एवढीच माफक अपेक्षा!

- डॉ. विनय काटे

Similar News