अखेर आरोपी फासावर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया...

Update: 2020-03-20 01:52 GMT

आज दिल्ली च्या निर्भया केसमधील 4 ही दोषींना अखेर फासावर लटकवण्यात आलं. सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 ला दिल्लीतील 23 वर्षाच्या पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. चित्रपट पाहून आल्यानंतर मित्रासोबत बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात असताना तिच्यावर अनन्वित अत्याचार करुन तिला धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं होतं. आज या चारही दोषींना फासावर लटकवण्यात आलं.

आज पहाटे ठीक 5:30 वाजता या नराधमांना फासावर लटकवण्यात आल्यानंतर निर्भयाची आई आशा देवी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. निर्भयाला मोठ्या संघर्षा नंतर न्याय मिळाला आहे. हा संघर्ष तिच्यासाठी होता. आणि हा संघर्ष पुढे देखील सुरुच राहील. मी आज माझ्या मुलीच्या फोटोला गळ्याला लावलं आणि म्हटलं शेवटी तुला न्याय मिळाला. यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की, या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी पीडित निर्भयाची आई आशा देवी आणि त्यांना या कठीण प्रसंगात साथ देणारी त्यांची बहीण सुनिता देवी, निर्भया ची कायदेशीर लढाई लढणाऱ्या वकील सीमा कुशवा यांनी दोषींना फासावर लटकवल्यानंतर अशा पद्धतीने आनंद साजरा केला.

ही घटना घडल्यानंतर तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असताना जनतेच्या मनात या घटनेबाबत मोठ्या आक्रोश होता. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं तत्कालीन सरकारने तिला पुढील उपचारासाठी सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, हे उपचार देखील शेवटी निष्फळ ठरले. 29 डिसेंबर ला उपचारा दरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला होता.

Similar News