दृष्टीकोन बदलण्याची गरज...

Update: 2020-03-08 11:00 GMT

महिला दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधताना मला आनंद होतोय, तसंच मनात एक खंत सुद्ध सलतेय. सक्षम झालेल्या महिला, यशस्वी महिला, प्रेरणादायी महिलांची चरित्रं, माहिती, त्यांच्या संघर्षकथा आजच्या दिवशी आपल्या समोर येतात, माध्यमांमध्ये त्याची चर्चा होते. हे सर्व पाहिल्यावर आपल्याला कल्पना येते की विविध क्षेत्रात महिलांनी किती प्रगती केलीय. या देशात महिला पंतप्रधान, महिला राष्ट्रपती होऊन गेल्या. कुठलंही क्षेत्र असं नाहीय, जिथे महिला मागे आहेत. हे अत्यंत प्रेरणादायी चित्र आहे. याच बरोबर मला चिंता ही वाटते. घरात येणारं वर्तमानपत्र रोज महिला अत्याचाराच्या बातम्यांच्या रकान्यांनी भरलेलं असतं. वाहिन्यांवर सातत्याने महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असते. हे सर्व पाहिलं तर वाटतं, की अजूनही बरंच काही करायची गरज आहे. अजून खूप टप्पा गाठायचा बाकी आहे.

परवा विधानसभेत भाषण करत असताना मी मॉब लिंचींग, तसंच अल्पसंख्यांक महिलांवर अत्याचार करा असा आदेश देणाऱ्या एका पक्षाच्या नेत्याचा उल्लेख केला. यावर सभागृहात काही लोकांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र माझी भूमिका अतिशय स्पष्ट होती. कुठल्याही जाती-धर्मातील असो महिलेवर सातत्याने अत्याचार होत असतो, तिच्यावर अत्याचार करावा अशी पुरूषप्रधान संस्कृतीची मानसिकता असते. मध्यंतरी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो चे धक्कादायक आकडे समोर आले होते. जवळपास 84 हजार मुली आणि महिला महाराष्ट्रातून गेल्या तीन वर्षात गायब झाल्याची माहिती समोर आली. हा आकडा हादरवणारा आहे. कुठे जातात या गायब झालेल्या महिला आणि मुली. यातील बहुतांश महिला सेक्स रॅकेट मध्ये ओढल्या जातात. मानवी तस्करीच्या बळी ठरतात.

हिंगणघाटच्या महिला प्रोफेसरला जाळून मारण्याची घटना असो, सिल्लोड मधली घटना असो आणि त्यानंतर समोर आलेल्या घटनांची मालिका असो.. सगळं सुन्न करणारं. अनेकदा माध्यमांमधली लोकं प्रश्न विचारतात. मला तर कळतच नाही काय उत्तर द्यावं. सरकारमध्ये असले तरी मी एक महिलाच आहे. मी ही एक आई आहे. या सर्व घटनांची संवेदनशीलता माझ्यापेक्षा आणखी तीव्रतेने कुणाला जाणवू शकेल. अशा घटना घडल्या की झोपच लागत नाही. प्रचंड अस्वस्थ व्हायला होतं.

एकीकडे अशा प्रकारचे हल्ले, अत्याचार यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता तर दुसरीकडे महिलांचा रोजगार घटत असल्याची समोर आलेली आकडेवारी. युनायटेड नेशन्सच्या आकडेवारी नुसार भारतातील महिलांचा रोजगारातील वाटा घटलाय. श्रमामधील महिलांचा वाटा 35 टक्क्यांहून कमी होऊन 2018 मध्ये तो 27 टक्क्यांवर आलाय. याचाच अर्थ महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य ही धोक्यात आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्राच्या पातळीवर हवे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. एकूणच परिस्थिती चिंताजनक आहे.

याच पार्श्वभूमीवर यंदा इच फॉर इक्वल या थीम वर यंदाचा महिला दिन साजरा केला जातोय. सर्व क्षेत्रात महिलांचा वाटा समान आहे, आणि महिलांना समान वागणूक मिळाली पाहिजे, समान संधी मिळाली पाहिजे यासाठी जनजागृती करण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नात आम्ही आमचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्याची महिला आणि बालविकास मंत्री म्हणून शपथ घेतल्यापासून मी अस्वस्थच आहे. महिलांना समान संधी आणि सन्माम मिळावा म्हणून जे जे शक्य आहे ते मला करायचंय. त्याचमुळे अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबतचा निर्णय असो किंवा वेतनामधला फरक असो असे निर्णय तातडीने घेतले. राज्यातील सर्व भागांमध्ये महिला आयोगाचं अस्तित्व दिसलं पाहिजे, जिल्ह्या जिल्ह्यात महिला भवन असलं पाहिजे, महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्यांना बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे, बचतगटांचं सक्षमीकरण करून त्यांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे यासाठी पोषण आहारातील निविदेच्या अनामत रकमेच्या अटीत शिथिलता आणणे असे प्रलंबित निर्णय तातडीने घेतले. केवळ सरकार वर अवलंबून राहून उपयोगाचं नाही, या कामात कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग ही आला पाहिजे यासाठी आवर्जून प्रयत्न केले.

पहिल्याच भेटीत जवळपास 30 कॉर्पोरेट कंपन्यांनी महिला रोजगार- प्रशिक्षणासाठी सीएसआर देण्यासाठी पुढाकार ही घेतला.. ग्रामीण भागातून आलेल्या माझ्या सारख्या एका सामान्य महिलेच्या खांद्यावर राज्याच्या महिला धोरणाचा भार आहे.. कधी कधी मला हे स्वप्नवत वाटतं. महाराष्ट्राच्या या मातीत महिला शिक्षण-सक्षमीकरणाचा पाया रोवला गेला. छत्रपती शिवाजी महाराज-शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात जिजाई-सावित्रीबाई फुले-फातिमा शेख यांनी महिलांना एक नवं जग खुलं करून दिलं. या नव्या जगात स्वतंत्रपणे आज मी श्वास घेऊ शकते. हेच स्वातंत्र्य या राज्यातील प्रत्येक महिलेला मिळावं म्हणून मी काम करायचं ठरवलंय. राज्यात पहिल्यांदाच मांडण्यात आलेल्या जेंडर बजेटच्या माध्यमातून यातलं पहिलं पाऊल मला टाकतं आलं याचा मला आनंद वाटतो

थोडंसं लांबलंय, पण जाता जाता आणखी एक सांगावंसं वाटतं, हे सर्व जादूच्या कांडीप्रमाणे होणार नाही. हे केवळ मी एकटी करू शकणार नाही. यासाठी तुम्ही सगळ्यांनीही पुढे यायला हवं. समाजातील प्रत्येक महिलेचं रक्षण करणं, तिला समान संधी देणं, सन्मान देणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण उचलूया. दृष्टीकोन बदलूया.

धन्यवाद

- यशोमती ठाकूर

महिला व बालविकास मंत्री

महाराष्ट्र

Similar News