जनाची नाही तर मनाची लाज असेल तर राजीनामा द्या- शालिनी ठाकरे

Update: 2019-08-08 08:22 GMT

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेशी वाद घालून तिचा हात मुरगळला असल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान सांताक्रूझ येथे एका महिलेचा हात पिरगळून तिला धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरत आहे. तर हा कटकारस्थान असल्याचा दावा महापौरांनी केला आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी महापौरांना पत्र लिहिलं असून या पत्रात राजीनामा देण्याची मागणी केली आहे. हे पत्र शालिनी ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केलं आहे.

काय लिहिलं आहे पत्रात

प्रति,

श्री. विश्वनाथ महाडेश्वर

महापौर, मुंबई

विषय : जनाची नाही तर मनाची लाज बाळगून 'महापौरपदाचा राजीनामा' देण्याबाबत...

महोदय,

'माननीय' किंवा 'आदरणीय' ही विशेषणं तुमच्या नावासमोर किंवा पदासमोर लावण्यासारखं तुमचं वर्तन नाही, म्हणून फक्त 'महोदय' असंच म्हणत आहे.

परवा सांताक्रूझ- वाकोला येथील पटेलनगरमध्ये माला नागम व संकेत नागम या मायलेकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानंतर तिथे जनक्षोभ उसळला आणि स्थानिक महिला-पुरुषांनी तुम्हाला दुर्दैवी कुटुंबाच्या घरी जाण्यापासून रोखलं. तिथल्या स्थानिक महिलांनी तर तुम्हाला गराडाच घातला. या महिलांमध्ये आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या कार्यकर्त्याही होत्याच. या सर्व महिलांचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी, त्यांच्या संतप्त भावनांचा मान राखण्याऐवजी तुम्ही महिलांनाच उद्देशून "ए दादागिरी करू नकोस, तुला माहीत नाही मी कोण आहे" असं वक्तव्य केलंत. इतकंच नव्हे तर, एका तरुणीचा हात पकडून तो मुरगळण्यापर्यंत तुमची मजल गेली. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हे दुष्कृत्य करण्याचा माजोरडेपणा तुम्ही केलात. ही सर्व घटना व्हिडिओत कैद झाली आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अवघ्या देशाला 'मुंबईच्या महापौरांचे प्रताप' समजले आणि प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाची मान शरमेने खाली गेली.

या संपूर्ण घटनेनंतर "माझी राजकीय प्रतिमा जाणीवपूर्वक मलीन करण्याचा प्रयत्न करणा-या मनसे पदाधिका-यांचा मी निषेध करतो" असं मत तुम्ही व्यक्त केलं आहे. पण स्थानिक लोक आणि विशेषत: महिला तुमच्यावर का संतापल्या, हे जाणून घेणं तुम्हाला महत्वाचं वाटलं नाही. स्वत:च्या नावापुढे 'प्रिन्सिपल' लावता, पण प्रिन्सिपलसारखं वागत नसाल तर काय फायदा?

तुमच्यावर ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून तुमच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे करणार आहोत. राज्य महिला आयोगाकडेही तुमच्याविरोधात साधार पुराव्यांसह दाद मागणार आहोत. मात्र हे सारं करताना मुंबईच्या महापौर पदाची शान धुळीला मिळणार, याविषयी खेद वाटतोय. म्हणूनच 'जनाची नाही तर मनाची लाज बाळगून' तुम्ही तत्काळ महापौरपदाचा राजीनामा द्यावा आणि महापौरपदाचा उरला-सुरला मान जपावा, ही तुमच्याकडे 'शेवटची मागणी' !

धन्यवाद !!

Similar News