"आई, आता काय करू? कंटाळा आला"

Update: 2020-03-19 11:09 GMT

गेल्या 6 दिवसांपासून अचानक सगळ्यांचं रुटीन बदललं. मुलांचंही बदललं. शरण्याची वार्षिक परीक्षा 7 फेब्रुवारीलाच संपली. त्यामुळं तिचं सुट्टीचं रुटीन सुरू झालं होतं. सकाळी स्विमिंग मग साधारण 2-3 किमी चालणं. घरी आल्यावर तिचे तिचे काही खेळ, वाचन, चित्रकला आणि तिचे टिव्हीवरचे ठरलेले 3-4 कार्यक्रम. मग संध्याकाळी परत 2 तास जिमनॅस्टिक्स. आमच्या बिल्डिंगमध्ये तिच्या वयाचं खेळायला कोणी नसल्याने घरात ती खेळण्यांशी किंवा माझ्याशी खेळते. स्विमिंग आणि क्रीडासंकुलात तिचे मित्रमैत्रिणी भेटतात. मग त्यांची धमाल चालते. पण गेले 6 दिवस पूर्णपणे घरात राहायला लागलो. पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवसापासून मग "आता काय करू? कंटाळा आला" हे पालुपद सतत सुरू झालं. घरातले खेळ, एनिमेशन पाहणं, वाचन, चित्रकला, काही वेबसाईट्स धुंडाळणं, किचनमध्ये लुडबूड सुरू आहेच. पण तरीही कंटाळा आहेच.. कंपाऊंडमध्ये सायकल चालवली तरीही काहीतरी मिसिंग असल्याचं जाणवत होतं. कुरबूर वाढायला लागली.

परवा तिच्या मैत्रिणीच्या आईचा काही कामानिमित्त फोन आला. आमच्या दोघींचं बोलणं झाल्यावर शरण्या तिच्या मैत्रिणीसोबत 40-45 मिनिटं बोलली. आणि मग माझी ट्यूब पेटली.. तिच्या फ्रेण्डस् सोबतचा 'थेट संवाद' थांबला होता. आपल्या सोबत कितीही गप्पा मारल्या तरी त्यांच्या त्यांच्या काही मजा असतातच ना.. त्यामुळे मी कालपासून तिच्या मित्रमैत्रिणींना, भावंडांना व्हिडिओ कॉल करायचं ठरवलं. काल तिच्या बँगलोरच्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला. दोघी सारख्याच वयाच्या. तासभर ह्यांचा व्हिडिओ कॉल सुरू होता. या दोन्ही कॉल्सनंतर तिचा मूड एकदम फ्रेश झाला... सो, आता घराबाहेर पडता येत नाही तोपर्यंत हे आम्ही रोज करणार आहोत...

मस्ती आणि मारामारी सोबत आमचे घरातले काही खेळ

1) नाव, गाव, फळ, फूल, खाऊ, खेळ, कपडे, उद्योग....शाळेत असताना खूप खेळायचो :)

2) फुली गोळा

3) ठिपके जोडून चौकोन

4) लिंबू फोड

5) पत्ते

6) बोर्ड गेम्स

7) इमॅजिनरी ट्रॅव्हल

8) एखादा रंग सांगायचा आणि त्या रंगातल्या ओरिजनल वस्तू, प्राणी इ.

आणि आयत्या वेळी काहीतरी सुचेल ते...

तुम्ही मुलांसोबत, मुलांचा वेळ घालवण्याकरता काय करता ते नक्की सांगा...

- साधना थिप्पनकाजे यांच्या वॉलवरून साभार

Similar News