मैमुनाभाभी छप्परबंद...

Update: 2019-05-05 14:24 GMT

या मला पहिल्यांदा भेटल्या 2014 साली मी निवडणूक लढवली तेव्हा पुण्याच्या मंगळवार पेठेतील नदीकाठच्या वस्तीत छप्पर बंद समाजाची मोठी वस्ती आहे. या वस्तीत अनेक प्रश्न आणि अडचणी... मैमुनाभाभी कमी शिकलेल्या पण वस्तीतल्या बायकांना संघटित करणार आणि प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित सरकारी अधिकाऱ्याला थेट भिडणार. रेशन दुकानदाराला नडून हक्काचं धान्य मिळवण्याचा प्रश्न असो की, दारिद्र्यरेषेचं कार्ड काढायचा प्रश्न असो मैमुनाभाभींचा यशस्वी पुढाकार ठरलेला. वस्तीच्या बाहेरचे काही टपोरी पोर वस्तीशेजारच्या पुलाखाली उभे राहून रात्री येता जाता मुलींवर शेरेबाजी करायचे, वस्तीतल्या पुरुषांच्या हातातलं घड्याळ, खिशातले पैसे हिसकावुन घ्यायचे. तेव्हा मैमुनाभाभींनीच महिलांना संघटित करुन या टपोरींना जाब विचारला आणि चांगलेच खडसावले. तो त्रास त्यानंतर बंद झाला. एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने "मलाला युसुफजाई" वरील उर्दू पुस्तकाचं प्रकाशन केलं. तेव्हा मैमुनाभाभी वस्तीतल्या मुलींना घेऊन हजर होत्या.

निर्माण संस्थेच्या Vaishali Bhandwalkar यांनी या वस्तीत मैमुनाभाभींच्या सहकार्यानं "सावित्रीची शाळा" सुरु केली तेव्हा माझी आणि त्यांची पुन्हा भेट झाली.

आज त्यांना व त्यांच्या परिवाराला तसंच त्यांना या सर्व कामात मदत करणारे माझे मित्र Hashim Shaikh यांना भेटायचं कारण म्हणजे मंगळवार पेठेतील या अनेकांना मनपाच्या एका योजनेत 280 स्क्वेअर फुटाचं घर वैदुवाडी, हडपसर परिसरात मिळालंय. तर आज त्यांचा गृहप्रवेश होता. सहा हजार रुपयांचं बोकड कापलं होत. मैमुनाभाभी आणि हाशिम शेख म्हणाले सर तुम्हाला यावंच लागतंय. मी उशिरा गेलो. दालचा-भात एकदम मस्त झाला होता. पण माझ्या पोटाच्या नेहमीच्या तक्रारीमुळे मला काही त्याला नीट न्याय देता आला नाही!

असो, तर मुळ मुद्दा असा की छप्परबंद समाज हा मुस्लीम समाजातील भटके विमुक्त समाज. म्हणजे दुहेरी अडचणीत असलेला समाज. आधी आपली ओळख मिळवण्यात अडकलेला आणि मग जगण्याचा अधिकार मिळवण्यात गुंतलेला. तरी मैमुनाभाभी आणि हाशिम शेख त्यातूनही स्वतःच्या कुटुंबाला आणि समाजाला पुढे नेण्याचा जिद्दीने प्रयत्न करत आहेत. नव्या वसाहतीत त्यांना पुन्हा "सावित्रीची शाळा" सुरु करायचीय. पोरं इकडे-तिकडे फिरुन शिक्षणापासून भटकू नयेत. यासाठी हा आटापिटा. मैमुनाभाभींच्या दोन नाती पाचवीत आणि सातवीत आहेत. भाभींची तक्रार अशी आहे की, त्यांना मराठी शाळेत घालूनही त्यांना चांगलं मराठी बोलता येत नाही. मला उगीचच नातवंडांना इंग्रजी शाळेत घालून मराठीच्या नावानं गळे काढणारे सुशिक्षीत आठवले.

पुरुषांच्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी काहीतरी करावं असं त्या सर्वांच्या मनात आहे. नव्या वसाहतीत दारुच आणि इतर व्यसनांचं प्रस्थ वाढु नये ही काळजी त्यांना घ्यायचीय. कष्टकरी समाजातील अशी माणस आपलेपणा जपण्यात आणि सामुहिकता वाढवण्यात पुढे असतात. मैमुनाभाभीच्या परिवाराच सहाव्या मजल्यावरच, लिफ्टची सोय नसलेले पाण्याची अजून पुरेशी सोय न झालेले, 280 स्क्वेअर फुटाचं घर झालं ही आनंदाचीच बाब आहे. त्या आनंदात मी आवर्जून सहभागी झालंच पाहिजे असं त्यांना वाटलं याचं मलाही खूप बरं वाटलं. प्रतिकूल परिस्थितीतही कुरकुर न करता, जिद्दीने लढणारी, मनाने श्रीमंत असणारी आणि जगण्यातल्या आनंदाचे क्षण जपणारी ही माणसे उमेद वाढवतात!

Similar News