राजकारणात कोणाच्या अश्रूंची होणार फुले...?

Update: 2019-10-22 12:24 GMT

राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेचं मात्र, त्यात निवडणूकीच्या काळात नेत्यांची अती उत्साहामध्ये जीभ घसरते आणि विरोधकाच्या भावना दुखावल्या जातात आणि मग अश्रूंना वाट मोकळी होते.

courtesy : social media

आता हेच पहा ना... परळी मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडें यांनी प्रचारसभेच्या शेवटच्या टप्प्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे पंकजा मुंडे दुखावल्या गेल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले.

courtesy : social media

या प्रकरणात पंकजा मुंडे यांनी शांततेची भूमीका जरी बजावली असली. तरी, त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांची धाकटी बहीण डॉ. प्रितम मुंडे यांनी पुढाकार घेतला. “एक भाऊच असं बोलत असेल तर राजकारणच नको.” असं बोलत असताना प्रितम मुंडे यांचेही अश्रु अनावर झाले.

courtesy : social media

धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू मांडली. यादरम्यान त्यांनी हा व्हिडीओ एडीट करून व्हायरल झाला असल्याचं सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आम्ही राजकीय विरोधक असलो तरी पंकजा माझी रक्ताची बहीण आहे. तिच्या बद्दल मी असं बोलेन का? असं बोलत असताना धनंजय मुंडे यांनीही भावनिक होऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.

courtesy : social media

असाच प्रकार पुण्यातील कोथरूड मतदारसंघातही घडला. भाजपने विदयमान आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मेधा कुलकर्णी भाऊक झाल्या आणि त्यांचे अश्रू अनावर झाले होते.

राजकारणातील अश्रू हे नेहमी दु:खाचेच असतात असं नाही. कर्जत जामखेड मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, शरद पवार यांनी म्हटलं की, “रोहीतनं केलेली काम पहायला पंतप्रधान स्वत: येतील.’ यावेळी रोहीत पवार यांच्या आई आणि बहीणीचेही अश्रू अनावर झाले.

एकुणचं निवडणूकीच्या निकालानंतर कोणत्या राजकारण्याच्या ‘अश्रुंची फुले’ होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Similar News