कश्मिरी मुलींना का टारगेट केलं ?

Update: 2019-08-06 11:03 GMT

स्त्रियांबद्दलची मानसिकता बदलायला हवी कालपासून वेगवेगळ्या समूहात हे काश्मीरमधील मुलींचे फोटो वायरल झाले असून सोबत लिहले आहे कि "मेरे कुंवारे दोस्तों करों तैयारी, 15 अगस्त के बाद कश्मीर में हों सकती हैं ससुराल तुम्हारी".

कल्पना करा तुमच्या घरातील मुलींचे वा बहिणीचे असे फोटो पाठवून कोणी असे काही लिहले तर काय वाटेल तुम्हाला? सन्मित्र संदीप लोहार, अर्चना चंद्रसेन आणि नचिकेत गुरव यांनीही या चुकीच्या मानसिकतेवर बोट ठेवले आहे.जेवढ्या तिकडच्या मुली सुंदर आहेत तेवढीच काश्मीरची मुलेही सुंदर आहेत मग द्याल का तुमच्या घरातील मुली तुम्ही तिकडच्या मुलांना?

आपण ज्या छत्रपती शिवरायांचे सतत नाव घेतो त्यांच्या अगदी विरुद्ध वागत नाही का आपण? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जेव्हा शिवाजी राजांकडे त्यांच्या एका सरदाराने भेट म्हणून पुढे आणले तेव्हा राजांनी मानसन्मान देऊन त्या सुनेला परत पाठविले होते तेही अश्या काळात ज्या काळात युद्धामध्ये हरल्यानंतर शत्रूच्या स्त्रियांची विटंबना केली जाई. स्त्रियांना भेटवस्तू म्हणून दिले जाई. त्यांचे आर्थिक व राजकीय शोषण कल्पनेपलीकडे गेले होते. युद्धात पकडल्या गेलेल्या स्त्रियांना बळजबरीने जनानखान्यात कोंबले जाई किंवा लग्न लावले जाई. शत्रूकडच्या महिलांकडे ही सन्मानाची वागणूक देणाऱ्या राजांकडून काय आदर्श घेतोय आपण?

जेव्हा एखाद्या देशासोबत क्रिकेट मॅच असते वा कुठली घटना घडते तेव्हा ही त्या त्या देशाबद्दल अश्याच प्रकारचे मेसेज आणि सोबतच त्या त्या क्रिकेटरच्या आईचा उद्धार मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येक वेळी त्या-त्या स्त्रियांना टार्गेट करणे आवश्यक असते का?

त्यामुळे असे काही पाठवतांना किंवा असे विनोद करतांना सद्सद्विवेक बुद्धीने विचार करायला हवा. लोकांनी आपल्या मेसेजला हसावे म्हणून आपण कुठल्या पातळीला जात आहोत? विनोद असावेत पण ते निखळ असावेत त्यातून कुठल्याही वर्गाचा अपमान होणार नाही हे तत्व आपण पाळायला हवे, सोशल मीडिया हे तंत्रज्ञान आपण चांगल्या पद्धतीने हाताळायला हवे आणि अश्या फॉर्वर्डस टाळायला हव्यात असे मला वाटते. कारण हे मेसेज जेव्हा काश्मीरचे तरुण वाचतील तेव्हा त्यांच्या मनावर काय परिणाम होईल? द्वेष निर्माण होईल कि प्रेम?आपणच विचार करा आणि ठरवा.

चूक भूल क्षमस्व

संकेत मुनोत

Similar News