पाणीप्रश्न आमदार यशोमती ठाकूर यांचा जलसमाधीचा इशारा

Update: 2019-05-13 10:57 GMT

वर्धा नदीचं पाणी अप्पर वर्धा धरणात सोडण्याची मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आदेशही दिले होते. मात्र, अचानक हा आदेश मागे घेतल्यानं आमदार यशोमती ठाकूर यांनी धरणातच जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

अमरावती जिल्हा तीव्र पाणीटंचाईला सामोरं जातोय. अशा परिस्थितीत वर्धा नदीचं पाणी अप्पर वर्धा धरणात सोडण्यात यावं, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी १२ वाजता धरणात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी धरणात पाणी सोडण्याचा आदेश मागे घेतला. त्यामुळं संतप्त झालेल्या आमदार यशोमती यांनी लोकांना पाणी न मिळाल्यास कार्यकर्त्यांसह अप्पर वर्धा धरणात जलसमाधी घेण्याचा इशाराच दिलाय.

पाण्याचं राजकारण...

अमरावती जिल्हा दुष्काळानं होरपळत असतांना जिल्हा प्रशासनानं अप्पर वर्धा धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपच्या नेत्यांनी राजकारण करत जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून पाणी थांबवल्याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केलाय.

Similar News