लॉकडाऊनमध्ये लालपरी धावणार, मोफत एसटी प्रवासासाठी 'या' आहेत अटी  

Update: 2020-05-10 04:02 GMT

लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले नागरिक तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे येत्या सोमवारपासून मोफत बससेवा सुरु केली जाणार आहे.

मोफत एसटी सेवेसाठी अटी

१. सोशल डिस्टनसिंग नियमानुसार प्रत्येक सीटवर एक प्रवासी बस शकतो. यामुळे एका बसमध्ये साधारणपणे 21 ते 22 लोक बसू शकतात. जर २१-२२ लोकांचा एक ग्रुप तयार झाला, तर त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तिथला पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून तो शहरी भागांमध्ये पोलीस आयुक्त कार्यालय आणि ग्रामीण भागांमध्ये जिल्हाधिकारी/ तहसीलदारांकडे जमा करावा. ज्या जिल्ह्यामध्ये ते जाणार आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आल्यानंतर त्यांना एसटी कधी आणि कुठून सुटणार याची माहिती कळवण्यात येईल.

२. जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एसटी महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवारपासून चालू होईल. ऑनलाईन अर्ज करतेवेळी, आपण सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्य करत आहात, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीचे पत्र जोडणे आवश्यक आहे.

३. या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, बसमध्ये चढतेवेळी हात सॅनिटायझरने स्वच्छ करणारे बंधनकारक आहे. निघण्यापूर्वी आणि पोहचल्यानंतर सॅसंपूर्ण निटाईज केली जाईल.

४. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकारी त्या त्या नोडल अधिकाऱ्यांकडे असतील.

५. ही सेवा पॉईंट टू पॉईंट आहे. प्रवासात मध्येच कुठेही प्रवाशांना उतरता येणार नाही किंवा चढता येणार नाही. लांबपल्ल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीत. त्यामुळे आपले अन्नपाणी घरूनच घेऊन यावे आणि तसेच प्रवासा दरम्यान फक्त महामंडळाचीच सॅनिटाईज केलेली प्रसाधनगृहे वापरता येतील.

६. कंटेनमेंटमध्ये झोनमधील नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही.

ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे, योग्य माहिती भरून आपापल्या घरी परत जावे पोलीस कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर गर्दी करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

Similar News