कबुली 

Update: 2019-04-25 05:06 GMT

कॉलेजच्या लायब्ररीत काही पुस्तकं अशी असायची ज्यांची खरेदी वीस तीस वर्षांपूर्वी झालेली असायची. पण त्या पुस्तकाच्या कार्डवर एकानेही पुस्तक वाचायला घेतल्याची नोंद नसायची. काही वेळा यात अलबर्ट कामू, हेमिंगवे, काफ्कापासून एकापेक्षा एक दिग्गज असायचे. पुस्तक हातात घेतलं की मला पुस्तका मागचं कार्ड चेक करून ते कुणी कुणी घेतलं आहे, ते पाहायचा नादच लागलेला. एकेका पुस्तकाला तीसेक वर्ष हातच लागलेला नव्हता. मी माझ्या कार्डवर ते पुस्तक घ्यायचे. पुस्तक आवडलं की अधाशीसारख वाचायचे. पण ते पुस्तक लायब्ररीत परत करताना जीवावर यायचं. आता पुन्हा या पुस्तकाला कुणाचा स्पर्श मिळेल की नाही या विचाराने अस्वस्थ व्हायचं. शिवाय एका वाचनात मन ही भरलेलं नसायचं. पण तरी पुस्तक जमा करायची तारीख आली की पुस्तक जमा करावं लागायचं. मी लायब्ररीत अगदी वेळच्या वेळी पुस्तक जमा करायचे. पण एखादं पुस्तक खूप आवडलं आणि ते स्पर्श न झालेल्या कॅटेगरीत असलं की माझं प्लॅनिंग सुरू व्हायचं. पुस्तक जमा केलं की ते शेल्फमध्ये पुन्हा त्याच्या जागी विराजमान व्हायचं. नवं पुस्तक शोधायला जायच्या बहाण्याने पुन्हा त्या पुस्तकाच्या शेल्फकडे जायचं. ते पुस्तक उचलायचं , त्याला वर्षानुवर्षे कुणी स्पर्श केला नाही याची खात्री करून घ्यायची आणि हळूच लायब्ररीच्या खिडकीकडे जायचं. त्या खिडकीतून पुस्तक हळूच बाहेर फेकायचं. थोड्या वेळानं हळूच लायब्ररीतून बाहेर पडायचं. मागच्या खिडकीत जाऊन पुस्तक उचलायचं. आणि साळसूदपणे वर्गाकडे फिरायचं.

हेमिंग्वेचं Farewell to Arms, ऑस्कर वाईल्डचं Picture of Dorian Grey आणि टॉल्स्टॉयच्या War and peace ची माझ्याकडची प्रत अशीच ढापु होती. या पुस्तकांना दुसऱ्या कुणाला स्पर्श करावा वाटला नाही, म्हणून मला या पुस्तकांची पारायणं करता आली.

Farewell मधली ती नर्स सारखी नजरेसमोर येते. आणि तेंव्हा तेंव्हा कॉलेजच्या लायब्ररीतला तो कप्पा भकास झाल्याचं फिलिंग येतं.

-योजना यादव

Similar News