कोरोना.. माणसाचं खरं रुप दाखवणारी महामारी

Update: 2020-05-05 08:15 GMT

माणसांचं आयुष्य चकित करणाऱ्या, धक्का देणाऱ्या असंख्य घटनांनी व्यापलेलं असतं.. त्याची अनुभूती अनेकदा येत राहते. आयुष्य जणू विचारतं. कलर कलर विच कलर डु यू वॉण्ट.. काळा पांढरा की ग्रे..

 

कालची बातमी.. करोनाच्या संदर्भात ज्या बातम्या येतात त्यात पहिला मुद्दा हा लोकांचे होणारे हाल असतो. त्यामुळे ते कमी करूयात, बातमी करता करता त्यांचा इश्यूही सोडवू असे दोन्ही पातळ्यावंर प्रयत्न सुरु असतात.

 

तर, काल सकाळी मुंबईत एका ठिकाणी एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह बारा तास घऱात पडून होता. त्याची सून चार दिवसांपूर्वी गेली होती, तिचा संसर्ग होऊन हे आजोबाही गेले असावेत. कारण त्यांना इतरही काही आजार होते. रुग्णवाहिका येत नव्हती. मदत मिळत नाही म्हणून नातेवाईकांचे फोनवर फोन. फोनाफोनी करून ती येईल अशी व्यवस्था केली.

 

पुढचे सगळे सोपस्कार झाले. ज्यांनी फोन केला ते दोघे मुलगे आणि त्यांच्या घरातलेही पॉझीटीव्ह होते. दोन्ही नातवंड मात्र निगेटीव्ह आली. त्यांनाही दादरला ठेवण्यात आलं.

 

पालिकेच्या अधिकाऱ्याला फोन केला, तेव्हा एरवी शांत असणारा हा माणूस धुमसत राहिला. "बा गेला या दोघांचा. आमची तक्रार मिडियात करतात. त्यांच्या मृतदेहाला हात लावायचं दूर, साधं पाहायलाही या दोन्ही मुलांपैकी कुणी पुढे आलं नाही.. कबुल भिती वाटते. पण किट देत होतो. समजावत होतो. यांची हिंमतही बांधत होतो. हे गेटवरून आतही यायला तयार नव्हते. रुग्णवाहिकेत असलेला माणूस आठव्या मजल्यावर येऊन आम्ही बॉडी का आणायची म्हणून विचारत होता..मी काय करायचं. मिडियाची टीका सहन करायची, की जन्म दिलेल्या बापाकडे न पाहणाऱ्या मुलांचा राग करायचा की इथे पोस्टिंग दिलीय म्हणून कपाळ आपटून घ्यायचं..." तो चिडचिडचिडला.

 

आज बातमी द्या, उद्या सकाळी सांगतो उरलेलं. सकाळ होईपर्यंत धीर धरवला नाही. रात्री साडेबाराला मेसेज केला. सर बोलू शकतो का, त्यांचा उलटा फोन आला. तुम्ही काय केलंत पुढे..

 

"फार काही नाही, माझ्या खिशातून पाच हजार रुपये खर्च करून दोन माणसं आणली आणि त्यांना पीपीई किट घालून रुग्णवाहिकेमध्ये बॉडी ठेवायला सांगितली. काल रविवार होता रुग्णवाहिका रेड झोनमध्ये लागल्यात. कुठेकुठे पाठवू. हे सांगितलं तर कारवाई होईल. रुग्णवाहिका नाही म्हटलं तरी दट्ट्या बसेल.खुर्चीला काटे खूप असतात मॅडम..."

 

मी काहीच बोलू शकले नाही..

 

कोण चूक कोण बरोबर, कोण संवेदनशील कोण नाही. कुणी अशावेळी काय करावं. किमान माणुसकी दाखवावी. मुलांची तक्रार होती माणुसकी दाखवली नाही, पालिकेचा अधिकारी बेंबीच्या देठापासून सांगत होता. बाप कुणाचा पण असला तरीही तो बाप असतो. शेवटचं दर्शन तरी दुरुन घ्यायचं.

( हा आटापिटा बातमी छापू नको सांगणारा नव्हता, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी नावासकट दिलं होतं...)

 

काल रात्री लो.टिळक रुग्णालयामध्ये नेऊन पुढची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. आजोबांच्या त्या दोन्ही मुलांना व त्यांच्या कुटुंबीयांना

कोरन्टाइन करून ठेवलंय , सकाळी त्यांनी फोन केला. ते सांगत होते..

 

'मॅडम मी रात्रभर झोपलो नाही, सतत तळमळ तळमळ...'

साहजिक आहे. तुम्ही फार विचार करू नका, त्याने त्रास वाढेल..तुम्हाला आता मुलांकडेही पाहायला हवं..समजुतीने म्हटलं..

नाही तुम्ही समजतायत तसं नाही ...

 

'इथे फॅन फार फास्ट नाही, त्यात जागा नवीन, स्टाफकडे मोठे दुसरे बैठे फॅन आहेत. त्यातले दोन आमच्यासाठी अरेंज करून द्याल का..'

 

फटकन खुर्चीतच बसले मी...मिनिटभर सगळं गर्रकन फिरलं..

 

-शर्मिला कलगुटकर

Similar News