रॉबिनहूड फुलनदेवी

जातीवाद्यांनी अत्याचार करूनही ती डगमगली नाही. जातीवाद्याच्या संघर्षा विरोधातच ती उभी राहिली. आणि त्याच जातीवाद्यांनी तिची हत्या केली. अशी 'Bandit Queen' अर्थात फुलनदेवी. जातीयवाद्यांच्या विरोधात पेटवून उठलेल्या मशालीची कहानी वाचा फुलनदेवी च्या जीवन प्रवासावर मुकुल निकाळजे यांनी टाकलेला प्रकाश…

Update: 2021-07-26 06:20 GMT

प्रस्थापित व्यवस्था ज्यांना डकैत म्हणते, ते स्वतःला बिहड के बागी (विद्रोही) म्हणतात. त्यांचा विद्रोह गावगाड्यातील सरंजामी, जातीय दहशतवादी गावगुंडांच्या विरुद्ध आहे. भारतीय समाज व्यवस्थेत जातीय वर्चस्ववादी व्यवस्था, पितृसत्ताक याची प्रचंड पकड आहे. उत्तर भारतात ती सर्वाधिक आहे. फुलनदेवी याच जातीय वर्चस्ववादी, पितृसत्ताक व्यवस्थेची पीडित होती. तिचा जन्म मल्लाह जातीत झाला होता. तिच्या पालकांनी तिचा बालविवाह केला होता. तिला तो मान्य नव्हता. त्यातून पळ काढत ती डकैतांच्या टोळीत सामील झाली.

त्या टोळीवर उच्च जातीच्या गुंडांनी हल्ला चढवला. त्यात फुलनच्या टोळीमधील अनेक जण मारले गेले. या संघर्षात जिंकलेल्या उच्च जातीय गुंडांनी फुलनला कैद करून आपल्या बेहमाई या गावात नेले. तिथे अनेक आठवडे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला. तेथून बाहेर निघाल्या नंतर ती पुन्हा एका टोळीत सहभागी झाली. त्या टोळीच्या आधारे ती ने तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा जश्यास तसा बदला घेतला.

बेहमाई गावात जाऊन तिने तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांपैकी 22 जणांना एका रांगेत उभा करून गोळ्या झाडल्या. चांबलच्या आसपासच्या भागात रॉबिनहूड म्हणून ती ओळखली जाऊ लागली. नंतर 1983 साली मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या उपस्थितीत आपल्या दहा हजार समर्थकांसह फुलनदेवी कायद्याला शरण गेली. 11 वर्ष जेलमध्ये काढले. 1994 साली उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यांनी तिच्यावरील गुन्हे मागे घेऊन तिची तुरुंगातून सुटका केली.

जेलमधून सुटल्यानंतर 1995 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेत नागपूरला दीक्षा भूमी येथे येऊन बुद्धास शरण गेली. 15 फेब्रुवारी 1995 बौध्द धम्माची दीक्षा घेतली. आपल्यावर हिंसा झाली, त्याचा आपल्याला प्रतिशोध घ्यावा लागला. परंतु आपला मार्ग हिंसेचा नाही, आपल्याला अहिंसा हवी आहे. असा संदेश फुलनदेवीने बौध्द धम्माची दीक्षा घेऊन दिला.

त्यानंतर संविधनिक मार्गाने या मनुवादी व्यवस्थेविरुद्ध आपला संघर्ष सुरू केला. एकलव्य सेना या नावाने आपले सामाजिक संघटना स्थापन केले. द्रोणाचार्य अर्जूनासाठी आता एकाही एकलव्याचा अंगठा कापून घेणार नाही याची दक्षता घेण्याचा निर्धार केला. 1996 व 1999 साली समाजवादी पक्षाच्या तिकिटावर मिर्झापूर मतदार संघातून लोकसभेत निवडून गेली.

शेवटी 20 वर्षा पूर्वी म्हणजे 25 जुलै 2001 रोजी आपल्या खासदार निवासाच्या बाहेर जातीय दहशतवाद्यांकडून फुलनदेवीची हत्या करण्यात आली. फुलनदेवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचं विनम्र अभिवादन आणि त्यांच्या जीवन संघर्षास सलाम!!!

- मुकुल निकाळजे

Similar News