"मी मास्क कधी काढला तर चालेल? "

"मास्क काढू नका, नाकाला जीवापाड जपा" असे वारंवार सांगून देखील कोणाला मास्क काढायचाच असेल तर साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया देशपांडे यांचं करोनापासून बचाव करण्यासाठीचं मार्गदर्शन नक्की वाचा...

Update: 2021-04-17 13:24 GMT

आपण खरेतर मास्क लावतो ते नाक आणि तोंडाजवळचा भाग करोनापासून सुरक्षित व स्वच्छ ठेवण्यासाठी. म्हणजे घरातून बाहेर पडताना जसा तो भाग स्वच्छ होता तसाच घरी परत आल्यावर देखील तो स्वच्छच राहायला हवा. म्हणून तर मास्क एकदा लावला कि काढायचा नाही असा नियम आहे. पण असे किती लोक करतात? अर्थातच खूप कमी... मात्र या साथीच्या काळामध्ये "इतर कोणी करत नाही म्हणजे मी पण केले नाही तर चालते" असे म्हणणे योग्य नाही. एका व्यक्तीने काळजी घेतली तरी भविष्यात होऊ शकणाऱ्या शेकडो केसेस टळतात. त्यामुळे आपण काळजी घेत रहायची.

"मास्क काढू नका, नाकाला जीवापाड जपा" असे वारंवार सांगून देखील कोणाला मास्क काढायचाच असेल (मास्क मधून नाक बाहेर काढणे म्हणजे पण मास्क काढणेच बरं का... ) तर हे नक्की लक्षात ठेवा.

मास्क "न काढण्याच्या" जागा

१. बोलताना मास्क काढू नये - बोलताना एरोसोल तयार होत असतात. म्हणून बोलताना, मोठ्याने बोलताना मास्क घालूनच बोलावे. पण आवाज नीट ऐकू येणार नाही म्हणून बरेच जण बोलताना मास्क हमखास काढतात आणि संसर्ग फैलावतात. बोलताना मास्क काढणे टाळले ना कि यामुळे खूप साऱ्या नव्या केसेस कमी होतील.

२. बंद खोलीमध्ये (indoor) असताना - बंद खोलीमध्ये व्हायरस जास्त काळासाठी हवेमध्ये राहतो. मास्क बंद खोलीमध्ये काढला कि संसर्गाचा धोका वाढतो. तसेच तुमच्यामुळे नकळत हवा दुषित देखील होऊ शकते.

३. इतरांसोबत असताना - कितीतरी जण मीटिंग मध्ये किंवा लोकांच्या सोबत असताना मास्क काढतात. भारतामध्ये आपण ६ फुट अंतर नाही ठेऊ शकत. तसेच आपल्या जुन्या सवयीमुळे आपण नेहमी एकमेकांच्या जवळ उभे असतो किंवा बसतो. जेव्हा आपण जास्त लोकांसोबत असतो तेव्हा त्यापैकी कोणीतरी बाधित असण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अश्या ठिकाणी मास्क बिलकुल काढू नये.

४. कारमध्ये प्रवास करताना - कारचा प्रवास नेहमी मास्क लावून आणि खिडक्यांच्या काचा कमीत कमी ३ इंच उघड्या ठेऊन करावा.

५. ग्रुप फोटो साठी / शुटींग साठी - मास्क काढताना व हाताळताना नकळत संसर्गाचा धोका वाढतो. तसेच फोटोसाठी आपण खूप जवळ उभे असतो. सध्या साध्या फोटोसाठी आजाराचा धोका पत्करणे चांगले नाही. या काळातले मास्क वाले फोटो काही वर्षांनी आपल्याला या अवघड काळाची आठवण करून देतील.

६. AC रूम / बस मध्ये असताना - कोणत्याही AC रूम वा बस व ट्रेन कोच मध्ये हवा खोलीच्या आत पुनर्प्रसारीत केली जाते. अश्या वेळी संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे AC वापरताना देखील खोलीची खिडकी उघडी ठेवण्याबाबत सुचना आहेत. बस व ट्रेन कोच साठी मार्ग काढावा लागेल.

७. कोविड सदृश्य लक्षणे आल्यानंतर / बाधित झाल्यानंतर -  जेव्हा आपल्याला शंका आहे किंवा माहित आहे कि व्हायरस आपल्या शरीरामध्ये आहे, अश्यावेळी त्याला शरीराबाहेर पडून इतरांना बाधित करू न देणे अतिशय महत्वाचे आहे. मग मास्कचा रात्रंदिवस वापर करणे आणि विशेषतः घरी असताना करणे अतिशय आवश्यक आहे. तर ही आहे मास्क "न काढण्याची " लिस्ट.

संसर्गाचा धोका सर्वत्र असल्याने आणि हवा नाकाच्या संपर्कामध्ये सतत असल्याने... केवळ स्वतःच्या घरीच मास्क काढणे कारण ती सर्वात सुरक्षित जागा आहे. बाकी तुम्ही समझदार आहातच ! मास्क काढताना विचार करुया, करोनाला हरवूया !

बोनस - घराबाहेर असताना बिलकुल मास्क काढला नाही / हनुवटीवर सरकवला नाही / नाक मास्क बाहेर ठेवले नाही आणि जर तुम्हाला इन्फेक्शन झालेच तर viral load कमी असतो आणि मग ऑक्सिजनची आणि दवाखान्याची शक्यतो गरज भासणार नाही.)

#covid_survival_tips_drpriya ६


- डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. साथरोग तज्ज्ञ, मिरज. fb page- Urban Health Center , GMC, Miraj. (सदर पोस्ट डॉ. प्रिया देशपांडे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Tags:    

Similar News