पीडितांचे 'बाबा', मात्र लाडक्या नातीला ते वाचवू शकले नाहीत

बाबा गेल्यानंतरही त्यांचे कार्य अविरतपणे चालूच राहिले, यांचे एक कारण त्यांच्या कुटुंबाची विस्मयकारक भावनिक गुंफण. पण अलिकडेच त्यांची नात डॅा. शीतल यांनी नैराश्यामुळे आपले जीवन संपवले. या परिवारात असे का व्हावे, हे एक कोडेच आहे. देशांतील पीडितांना आशेचा किरण दाखवून जगण्याची उमेद देणाऱ्या बाबांच्या लाडक्या नातीला मात्र ते वाचवू शकले नाहीत. ही नीयतीचीच अजब लीला.

Update: 2020-12-26 05:30 GMT

आधुनिक भारताचे संत साक्षात करुणामुर्ती, समाजसेवक बाबा आमटे यांचा आज जन्मदिन ! कुष्ठरोग निवारणापासून 'भारत जोडो' आंदोलनापर्यंत विविध आघाड्यांवर अविरत कार्य करणाऱ्या या खऱ्या कर्मयोग्याला शतश: वंदन !

बाबांचे सारे जीवन विविध नाट्यांनी सजलेले होते. त्यांचे पाळण्यातील नाव मुरलीधर. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात १९१४ मध्ये झाला. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसिंग कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. आपण स्वतः डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले.

त्यांनी काही काळ वकिलीही केली. याच काळात सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी १९८५ मध्ये 'भारत जोडो' अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

त्या काळात तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली.

१९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८ पर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. ९ फेब्रुवारी २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले.

असे बाबा आमटे. त्यांच्या बरोबरीनेच त्यांच्या पत्नी साधनाताई या सेवाकार्यात उतरल्या होत्या. पुढे त्यांचे दोन्ही पुत्र- विकास व प्रकाश हे दोघेही सहकुटुंब बाबांच्या कार्यात आले. आता त्यांची मुले अनिकेत, कौस्तभ व कन्या शीतल हेही याच सेवाकार्यात आले.

समाजसेवेसाठी सर्वस्व झोकून देणारी आमटेंची ही तिसरी पिढी. असे उदाहरण विरळाच.

बाबा गेल्यानंतरही त्यांचे कार्य अविरतपणे चालूच राहिले, यांचे एक कारण त्यांच्या कुटुंबाची विस्मयकारक भावनिक गुंफण. पण अलिकडेच त्यांची नात डॅा. शीतल यांनी नैराश्यामुळे आपले जीवन संपवले. या परिवारात असे का व्हावे, हे एक कोडेच आहे. देशांतील पीडितांना आशेचा किरण दाखवून जगण्याची उमेद देणाऱ्या बाबांच्या लाडक्या नातीला मात्र ते वाचवू शकले नाहीत. ही नीयतीचीच अजब लीला.

बाबांची प्रतिभा अफाट. त्यांचे 'ज्वाला आणि फुले' व 'उज्वल उद्यासाठी' हे कविता संग्रह त्यांच्या दुर्दम्य आशावादाचे व प्रतिभेचे दर्शन घडवतात.

दिव्यत्वाची जेथ प्रचिती,

तेथे कर माझे जुळती

बाबांना प्रणाम !

- भारतकुमार राऊत

Tags:    

Similar News