"द गिल्टलेस मॅन- निष्कलंक माणूस"

“एखाद्या प्रामाणिक माणसाने कधीकाळी एखादा डाइम जरी चोरला असेल तर त्याला आपण बँकेवर दरोडा घातल्याच्या शिक्षेएवढी शिक्षाही देऊ शकतो. कारण आपल्याला ही शिक्षा व्हायलाच हवी असं त्याचं त्यालाच पटलेलं असतं.” वाचा सध्याच्या समाजमनावर भाष्य करणारा मुग्धा कर्णीक यांचा लेख..

Update: 2021-03-20 12:45 GMT

....... आपल्या चिंधडया उडवून देण्याची ताकद आहे त्याच्यात. त्याने काही केलं तर आपण त्यातून सावरू शकू की नाही हा प्रश्नच आहे. आजची परिस्थिती इतकी नाजूक आणि गंतागुंतीची आहे की कधी काय होईल सांगता नाही येणार. एखाद्या बारीकशा घटनेनेही सारा तोल ढासळू शकेल. सारी व्यवस्था कोलमडून पडू शकेल. आणि हे करावंसं वाटणारा तोच एक आहे. मनात आलं तर तो हे करू शकतो. त्याला यातलं सत्य बरोबर कळलंय. जे आपण बोलणार नाही- पण तो ते स्पष्ट बोलून दाखवायला कचरणार नाही. तेच त्याच्याकडचं शस्त्र आहे. महाभयंकर शस्त्र. तोच आपला सर्वात मोठा शत्रू आहे."

"कोण? कोणाबद्दल चाललंय हे?" लॉसनने विचारलं.

डॉ. फेरीसने खांदे उडवले. मग थोडं थबकून उत्तर दिलं.

"द गिल्टलेस मॅन- निष्कलंक माणूस."

"मला नाही कळलं." लॉसन कोऱ्या नजरेने म्हणाला.

जेम्स टॅगार्ट हसला.

डॉ. फेरीस म्हणाला, "कुठल्याही माणसाला निःशस्त्र करायचं असेल तर आपल्या हाती त्याच्या एखाद्यातरी अपराधाची कळ हवी. त्याने स्वतःशी मान्य केलेल्या अपराधाची कळ.

एखाद्या प्रामाणिक माणसाने कधीकाळी एखादा डाइम जरी चोरला असेल तर त्याला आपण बँकेवर दरोडा घातल्याच्या शिक्षेएवढी शिक्षाही देऊ शकतो. तो ती भोगेल. तो सारं काही सोसेल. कारण आपल्याला ही शिक्षा व्हायलाच हवी असं त्याचं त्यालाच पटलेलं असतं. जगात अपराधाची जाणीव तयार करावी लागते. फुलांकडे पहाणं हा अपराध आहे असं जर आपण ठसवत आलो आणि त्यावर लोकांनी विश्वास ठेवला तर ते फुलांकडे पाहिल्यावर स्वतःला अपराधी मानू लागतात- स्वतःला शिक्षा व्हायला हवी असं त्यांना वाटू लागतं. त्यांचं आपण काहीही करू शकतो. ते स्वतःचा बचाव करणार नाहीत, स्वतःला निरपराध समजणार नाहीत. लढणारच नाहीत. पण स्वतःच्या मूल्यांनुसार जगणारा माणूस- अंहं... याच्यापासून सावध रहायला हवं. स्वच्छ सदसद्विवेकबुध्दी असलेला माणूस. असा माणूस आपल्याला नेस्तनाबूत करू शकतो."

- मुग्धा कर्णीक

-ॲटलस श्रग्डच्या माझ्या अनुवादातून

Tags:    

Similar News