रक्षाबंधनाचा अर्थ आता बदलू या...

आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की, रक्षाबंधनच्या निमीत्ताने बहिणीने भावाला राखी बांधावी आणि भावाने त्याबदल्यात बहिणीचे रक्षण करावे. पण बहिण भावाचं नातं अतूट असतं. पण आजच्या काळात बहिणींनी भावाला माझं रक्षण कर, असं बोलावं याची गरज आहे का? मुली स्वतःचं रक्षण करायला सक्षम नाहीत का? यावर भाष्य करणारा हेरंब कुलकर्णी यांचा लेख....

Update: 2023-08-30 05:02 GMT

बहिणीने भावाला राखी बांधून प्रेम वृध्दींगत करण्याचा रक्षाबंधन हा सण अतिशय प्रेममय आहे. नात्यातील बंध अधिक घट्ट करणारा हा सण आहे.

मानलेली बहीण भाऊ हे नाते तर स्त्री पुरुष नात्याला उन्नत करणारे आहे.

पण या सणातील जो दुसरा भाग आहे ते मात्र आता बदलण्याची गरज आहे. 'माझे रक्षण कर ' ही भावना कालानुरूप बदलायला हवी.

जेव्हा सरकार नावाची गोष्ट नव्हती. तेव्हा महिला सुरक्षित नसताना शस्त्र असणाऱ्या भावाला संरक्षणाची गळ घातली जाणे स्वाभाविक होती.पण आज स्त्रिया पोलीस अधिकारी होत आहेत. राजकीय पदांवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार होत आहेत. सैन्यात आहेत. त्याच अनेक ठिकाणी समाजाचे आणि समाजातील पुरुषांचे रक्षण करत आहेत अशी स्थिती आहे. अशावेळी पुरुषांनीच अशा उच्चपदस्थ महिला पदाधिकारी,अधिकारी यांना राखी बांधायला हवी..!!!!

कमरेला पिस्तूल असणारी महिला पोलीस अधिकारी तिच्या भावाला रक्षण कर म्हणून राखी कसे काय बांधेल ?

तेव्हा आता या सणाचा सामाजिक अर्थ निर्माण करू या.

समाजातील जे सबल आहेत त्यांनी जे जे दुर्बल आहेत त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प करू या.

पूर्वी स्त्रिया दुर्बल होत्या म्हणून पुरुष त्यांचे रक्षण करीत. आता शिकलेल्या स्त्री पुरुषांनी जे स्त्री पुरुष गरीब आहेत, गरजू आहेत, दुर्बल आहेत त्यांच्या रक्षणाची हमी घ्यावी. त्यांना मदत करावी.

हा बहिणीचा सण आपण मानणार असू तर समाजात आज विधवा महिला,घटस्फोटित, परित्यक्ता या एकाकी आहेत. दिव्यांग महिला, कचरावेचक, सफाई काम करणाऱ्या महिला, शरिरविक्रय करणाऱ्या महिला, पोटासाठी स्थलांतर करावे लागणाऱ्या ऊसतोड, वीटभट्टी वरील महिला, गरीब कुटुंबातील महिला, दारुड्या नवऱ्याचा मार खाणाऱ्या महिला या महिलांना मदत करण्याची आज गरज आहे. या महिलांचे रक्षण आणि पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खरे रक्षाबंधन होईल.

त्याचबरोबर समाजातील सर्व शोषित वंचित या दुर्बलांना सबल व्यक्तींनी मदत करणे म्हणजे रक्षाबंधन होय...

दुर्बल स्त्री आणि तिचे रक्षण करणारा सबल पुरुष हा संदर्भ हळूहळू बदलत नेवू या ...

साने गुरुजींच्या शब्दात --

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती

तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे..

गुरुजींची ही प्रार्थना हेच खरे सामाजिक रक्षाबंधन आहे...

Tags:    

Similar News