हिजाब थोपोगे तो हिजाब के खिलाफ हुं... हिजाब खिचोगे तो हिजाब के साथ हुं...
- समीना पठाण.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सार्वजनिक व्यासपीठावर केलेले कृत्य हे अतिशय निंदनीय आहे. या वृत्तीचा तीव्र निषेध आहे. अशा पद्धतीने एखाद्या महिलेचा सार्वजनिक रित्या अपमान करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
मी स्वतः हिजाब चे समर्थन करत नाही, परंतु माझा हिजाब ला विरोध देखील नाही. तो व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे पालन आणि आचरण करण्याचा अधिकार आहे.
इस्लाम मध्ये हिजाब/ नकाब/ बुरखा अनिवार्य किंवा सक्तीचे आहे असे सांगितलेले नाही. जर मुस्लिम महिलांना हिजाब हा धार्मिक ओळख किंवा संस्कृती पेक्षाही स्वतःच्या आत्मसन्मानाचे प्रतीक वाटतो, तर त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर झालाच पाहिजे.
एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट आचरणा विषयी आपण असहमत असू शकतो, परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्या व्यक्तीचा अपमान करण्याचा अधिकार आहे. भारतीय दंड संहितेतील कलम 354 नुसार महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली कृती हा एक गंभीर गुन्हा आहे.
येथे एक मुद्दा नमूद करावासा वाटतो, व्यक्तिगत ओळख/मतदान कक्ष/ सुरक्षा तपासणी या ठिकाणी मुस्लिम महिलांची वागणूक पारदर्शी आणि सहकार्याची असेल, तर बुरखा परिधान करणाऱ्या महिलेवर कोणीही संशय घेऊ शकणार नाही. तसेच जाणीवपूर्वक बुरख्याचा वापर करून गैर कृत्य करणाऱ्या, मुस्लिम समाजासाठी बदनाम कारक ठरणाऱ्या घटनांना आळा बसू शकेल.
ज्याप्रमाणे वरील मुद्द्यावर मुस्लिम समाजाने आत्मपरीक्षण आणि अंतर्गत सुधारणा करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे समाजाने देखील मुस्लिम समाजाप्रती सलोख्याची भावना जपणे महत्त्वाचे आहे.
जेव्हा प्रसार माध्यमे समाजात मुस्लिम समाजा विषयी द्वेष पसरवतात, मुस्लिमांना दुय्यम नागरिकतेची वागणूक मिळते, पक्षपातपणाचा अनुभव येतो, तेव्हा मुस्लिम समाजामध्ये भेदभाव, असुरक्षितता आणि वंचित असल्याची भावना निर्माण होते.
एकीकडे मुस्लिमांना घरे नाकारली जातात आणि दुसरीकडे मुस्लिम समाज अलगीकरण/ जमातवाद करतो आहे, असेही म्हटले जाते.
मुस्लिम समाजातील काही महिलांचे शिक्षण कमी असते, त्या आर्थिक परावलंबी असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते. ज्या महिला स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही आणि ज्यांच्यावर कौटुंबिक, धार्मिक आणि सामाजिक नियंत्रण असते, ज्यांच्या पर्यंत सामाजिक सुधारणाचे वारे पोहोचलेले नाही अशा महिलांकडून आधुनिकीकरणाची अपेक्षा न बाळगता त्यांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे.
पितृसत्तेच्या ओझ्याखाली दबलेल्या प्रत्येक महिलेपर्यंत जोपर्यंत संविधानिक अधिकार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्त्रीवादी दृष्टिकोन पोहोचत नाही, तोपर्यंत ती महिला धार्मिक चौकटीच्या बाहेर पडून स्वतःला सिद्ध करू शकणार नाही, स्वतःची प्रगती करू शकणार नाही.
समीना पठाण.
मुस्लिम सत्यशोधक मंडळ, पुणे.
7709424226.