स्त्रीने स्वतःसाठी वेळ मागणं स्वार्थ आहे का?
स्वतःची देखभाल, guilt आणि समाजाची अपेक्षा
आधी सगळे, मग तू”
लहानपणापासूनच स्त्रीला ‘आधी इतरांचा विचार कर’ ही एक गोष्ट नकळत शिकवली जाते. आई, बहीण, मुलगी असताना हा विचार संस्कार म्हणून रुजवला जातो. पुढे बायको, सून, आई होताना तो जबाबदारी बनतो. आणि या सगळ्या प्रवासात “तूला स्वतः काय हवंय?” हा प्रश्न कुठेतरी हरवतो.
स्त्री जेव्हा स्वतःसाठी वेळ मागते, तेव्हा तो वेळ मोकळा श्वास घेण्यासाठी गरजेचा असतो.तिला तीच मन सावरायचं असतं, थोडं शांत बसायचं असतं. पण समाजाला हा वेळ नेहमीच संशयास्पद वाटतो. जणू काही स्वतःसाठी वेळ घेणं म्हणजे कुटुंबापासून पळ काढणं.
आत्मदेखभाल म्हणजे ऐषआराम नव्हे
आजकाल “self-care” हा शब्द खूप वापरला जातो. पण त्याचा अर्थ अनेकदा चुकीचा लावला जातो. आत्मदेखभाल म्हणजे स्पा, ट्रिप्स किंवा लक्झरी नाही. आत्मदेखभाल म्हणजे आपण थकलेलो आहे हे मान्य करणं, रडावंसं वाटतंय हे स्वीकारणं आहे. “आज मला नाही जमत” असं सांगण्याचं धाडस करणं आहे.
पण स्त्रीने हे केलं की लगेच प्रश्न विचारले जातात. घराचं काय? मुलांचं काय? जबाबदाऱ्यांचं काय? जणू काही स्त्री थांबली तर सगळं कोलमडून पडेल. या विचारसरणीत स्त्रीला सतत चालणारं, न थकणारं यंत्र बनवलं जातं.
guilt: स्त्रीचा कायमचा सोबती
स्वतःसाठी वेळ घेताना स्त्रीला जे सर्वात जास्त छळतं, ते म्हणजे guilt. हा guilt कुणी बाहेरून दिलेला नसतो; तो आतून तयार झालेला असतो. समाजाच्या अपेक्षा, टोमणे, तुलना या सगळ्यांतून तो तिच्या मनात खोलवर रुजलेला असतो.
ती जरा निवांत बसली तर तिला वाटतं, मी आई म्हणून कमी पडतेय.
ती एकटी बाहेर गेली तर वाटतं, मी बायको म्हणून जबाबदारी टाळतेय.
तीने स्वतःचा विचार केला तर वाटतं, मी स्वार्थी आहे.
हा guilt इतका खोलवर असतो की तिची मागणी अत्यंत मूलभूत असली तरी स्त्री स्वतःला दोष देत राहते.
पुरुषांचा वेळ आणि स्त्रीचा वेळ: दुहेरी मापदंड
थकलेला पुरुष घरी आला की त्याला विश्रांती मिळणं स्वाभाविक मानलं जातं. “आज त्याचा दिवस कठीण होता” हे सगळे समजून घेतात. पण स्त्री थकली की तू दमण्यासारखं दिवसभर केलंस तरी काय? असे प्रश्न विचारले जातात. स्त्रीचा वेळ नेहमी ‘उपलब्ध’ समजला जातो. तिचा थकवा दिसत नाही, तिची मानसिक गरज ऐकली जात नाही आणि म्हणूनच जेव्हा ती स्वतःसाठी वेळ मागते, तेव्हा तो समाजाच्या डोळ्यात खुपतो.
स्त्रीची किंमत तिच्या त्यागावरच का मोजली जाते?
आपल्या समाजात चांगली स्त्री म्हणजे त्याग करणारी स्त्री ही संकल्पना खोलवर रुजलेली आहे. जितका जास्त त्याग, तितकं जास्त कौतुक. पण हा त्याग कुठे नेऊन सोडतो? तर थकवा, चिडचिड, नैराश्य, भावनिक रिकामेपणाकडे.
स्त्री स्वतःसाठी वेळ घेत नाही म्हणून ती ‘चांगली’ ठरते, पण आतून ती तुटत जाते. या तुटण्याकडे कुणाचं लक्ष जात नाही, कारण बाहेरून ती सगळं ‘मॅनेज’ करत असते.
स्वतःसाठी वेळ म्हणजे नात्यांपासून पळ नाही
स्वतःसाठी वेळ घेणं म्हणजे नात्यांपासून दूर जाणं नव्हे. उलट, स्वतःशी जोडलेली स्त्री नात्यांमध्ये अधिक प्रामाणिकपणे उपस्थित राहू शकते. रिकाम्या मनानं प्रेम देता येत नाही. दमलेल्या शरीरानं जबाबदाऱ्या पेलता येत नाहीत. हे साधं सत्य स्त्रीला सतत सिद्ध करावं लागतं आणि तेच दुर्दैव आहे.
स्त्री स्वतःलाच का परवानगी देत नाही?
समाज बदलायला वेळ लागतो, पण अनेकदा स्त्री स्वतःलाच थांबवत असते. लोक काय म्हणतील? घरात गैरसमज होतील का? या प्रश्नांमुळे ती स्वतःच्या गरजांवरच कात्री लावते.
स्वतःसाठी वेळ घेणं हे बंड नाही; ती स्वीकृती आहे मी माणूस आहे. ही जाणीव स्त्रीने आधी स्वतःमध्ये रुजवणं गरजेचं आहे.
आत्मदेखभाल म्हणजे टिकून राहण्याची कला
आज स्त्रिया अनेक भूमिका निभावत आहेत— करिअर, कुटुंब, नाती, जबाबदाऱ्या. या सगळ्यात टिकून राहायचं असेल, तर स्वतःची देखभाल ही लक्झरी नसून गरज आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य, स्वतःशी संवाद या गोष्टी दुर्लक्षित करून पुढे जाता येत नाही. स्त्री जेव्हा स्वतःसाठी वेळ घेते, तेव्हा ती कमकुवत होत नाही; ती सक्षम होते.
प्रश्न बदलण्याची गरज
म्हणून आज खरा प्रश्न हा नाही की स्त्रीने स्वतःसाठी वेळ मागणं स्वार्थ आहे का?
खरा प्रश्न असा आहे—
स्त्रीला स्वतःसाठी वेळ मागावाच का लागतो?
जोपर्यंत स्त्रीचा वेळ तिचा स्वतःचा मानला जात नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य हे फक्त बोलण्यापुरतचं राहणार.