नितीश कुमारांच 'ते' कृत्य
केवळ शिष्टाचारभंग की सत्तेच्या गर्वातून आलेला अहंकार?
नितीश कुमार यांचा अलीकडेच समाजमाध्यमांवर प्रसारित झालेला तो व्हिडिओ कोणत्याही सुसंस्कृत व्यक्तीला अस्वस्थ करणारा आहे. पाटणा येथील एका अधिकृत कार्यक्रमात, एका नवनियुक्त महिला डॉक्टरचे नियुक्तीपत्र देताना मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे तिच्या डोक्यावरील हिजाबला स्पर्श करून तो ओढला, ते पाहून अनेक प्रश्न मनात उभे राहतात. एक सामान्य स्त्री म्हणून या घटनेकडे पाहताना हे केवळ राजकीय नाट्य वाटत नाही, तर ते एका महिलेच्या 'व्यक्तिगत सन्मानावर' झालेले आक्रमण वाटते.
एखादी मुलगी जेव्हा डॉक्टर होते, तेव्हा त्यामागे तिची वर्षानुवर्षांची मेहनत असते. त्या मंचावर ती तिचं स्वप्न सत्यात उतरताना पाहायला गेली होती. पण तिथे काय झालं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर तिच्या डोक्यावरचा हिजाब ओढला. आपण कोणत्या काळात जगतोय? एखादी व्यक्ती मुख्यमंत्री आहे म्हणून तिला कोणाच्याही वैयक्तिक पेहरावाशी छेडछाड करण्याचा परवाना मिळतो का? संमती नसताना कोणाच्या तरी कपड्यांना हात घालणे, तो ओढणे हा केवळ सत्तेतून आलेला अहंकार आहे. 'मी मुख्यमंत्री आहे, मी तुला हवे तसे वागवू शकतो' ही ती वृत्ती आहे.
सर्वात जास्त वाईट याचं वाटतं की, त्या महिला डॉक्टरची तिथे काय अवस्था झाली असेल? इतक्या लोकांसमोर, कॅमेऱ्यांसमोर जेव्हा तुमच्यासोबत असं घडतं, तेव्हा तुम्ही काही बोलू शकत नाही, फक्त सुन्न होऊन उभे राहता. आपण मुलींना 'शिका आणि प्रगती करा' असं सांगतो, पण ज्यांनी त्यांचं रक्षण करायला हवं, तेच जर असं वागायला लागले तर?
हा प्रश्न केवळ हिजाबचा नाहीये. हा प्रश्न आहे 'सन्मानाचा' आणि 'पर्सनल स्पेसचा'. माझ्या शरीरावर, माझ्या कपड्यांवर पहिला आणि शेवटचा अधिकार माझा आहे. तो पदर असो, ओढणी असो वा हिजाब—तो सावरण्याचा किंवा काढण्याचा अधिकार फक्त त्या स्त्रीचा असतो.
शेवटी मनात एकच विचार येतो, जर हेच कृत्य मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी एखाद्या सामान्य माणसाने रस्त्यावर केलं असतं, तर आपण त्याला काय म्हटलं असतं? मग अधिकार मोठा आहे म्हणून गुन्हा लहान होतो का? आपण प्रगत समाजाच्या गप्पा मारतो, पण जोपर्यंत सत्तेत बसलेल्या पुरुषांच्या डोक्यातली ही 'पुरुषी अहंकाराची' भावना जात नाही, तोपर्यंत स्त्रीचा सन्मान केवळ कागदावरच राहणार.
खरोखर, 'सुशासन' हे भाषणात असून चालत नाही, ते समोरच्या व्यक्तीला दिलेल्या वागणुकीतून दिसायला हवं.