MEN CAN CRY

पुरुष दिनी पुरुषांच्या संवेदनशीलतेला मान्यता देणे आणि भावनांना मोकळी व्यक्त करण्याचा संदेश

Update: 2025-11-20 10:40 GMT

काल Mens Day होता असा दिवस ज्या दिवशी आपण पुरुषांच्या जीवनातील त्यांची जडलेल्या भावनांना, संवेदनशीलतेला आणि अकथित गोष्टींना जागा देऊ शकतो. पुरुष दिन हा दिवस फक्त पुरुषांच्या सामर्थ्याचा, त्यांच्या जबाबदाऱ्यांचा किंवा त्यांच्यावरील समाजाच्या अपेक्षांचा साजरा करण्याचा दिवस नाही, तर हा दिवस त्यांच्या अकथित गोष्टींना समजून घेण्याचा, त्यांच्या संवेदनशीलतेला मान्यता देण्याचा दिवस आहे.

या संदर्भातच बोरीवली स्टेशनवरचा तो व्हायरल व्हिडिओ आठवला तर मन खूप विषण्ण होत. एक पुरुष शांतपणे रडत बसलेला, हुंदके न देता त्याच्या अश्रूंना आवाज नव्हता. तो स्वतःच्या वेदनांशी सामना करत होता. त्याचा हा क्षण खूप बोलकी गोष्ट सांगतो — ‘पुरुषांनी रडू नये’ हे विधान समाजाने तयार केलेले एक चुकीचा नियम आहे. पुरुष देखील वेदना अनुभवतात, त्यांना भीती, दु:ख, थकवा येतो आणि त्यांनाही माणुसकीची गरज असते.

आपण लहानपणापासून पुरुषांना शिकवतो की रडणं म्हणजे कमजोरी आहे, भावना दाखवणे पुरुषत्वाला धक्का देणारे आहे. त्यांना समाज सांगतो की पुरुषांनी कायम कठोर असावे, कधीही डळमळू नये आणि कधीही आपल्या वेदना व्यक्त करू नयेत. परंतु या दडपणामुळे पुरुष त्यांच्या मनातील भावना, भीती आणि वेदना लपवतात. बऱ्याच वेळा ते त्यांच्या दु:खाला स्वतःमध्येच दडवून ठेवतात आणि बाहेरच्या जगासमोर चेहेऱ्यावर हसू ठेऊन, सशक्त माणूस म्हणून उभे राहतो.

पुरुषांच्या जीवनातील ही परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे. ते आपल्या कामात, घरात आणि समाजात प्रत्येक वेळेला जबाबदारी सांभाळत राहतात. घरातले कुटुंब, ऑफिसमधले सहकारी, मित्रपरिवार या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना ते स्वतःला विसरतात. बरेच पुरुष घरकामात हातभार लावतात, मुलांची काळजी घेतात, स्वयंपाक करतात पण त्याचा उल्लेख फारसा होत नाही कारण समाजाच्या दृष्टीने ही गोष्ट त्यांच्या पुरुषत्वाला धक्का पोहोचवणारी असते.

काही पुरुष आपल्या आसपासच्या स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी खूप लढतात पण या सर्व संवेदनशीलतेला फारसे महत्व दिले जात नाही. पुरुषांचे हृदय, त्यांची भावना आणि त्यांचा संघर्ष ही अकथित गोष्ट आहे. जी जाणून घेण्यात फारसा कोणाला रस नसतो.

समाजाच्या अपेक्षांमुळे पुरुषांना असं वाटतं की त्यांना भावनिकदृष्ट्या मजबूत राहणे आवश्यक आहे. “पुरुषाने रडू नये” या विधानामुळे पुरुष अनेकदा मानसिक तणावाखाली राहतात. त्यांना स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचीही संधी मिळत नाही. पुरुषांचा हा प्रवास जरा वेगळाच आहे. काही पुरुष आपल्या आयुष्यातील संघर्ष दुसऱ्यांसमोर व्यक्त करत नाहीत. काही पुरुष आपल्या आवडी-निवडींना बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी वेळ देतात. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून हे पुरुष खूप शक्तिशाली वाटतात. कारण स्त्रिया त्यांच्या शक्तीचे मापन फक्त बाह्य रूपात करत नाहीत तर त्या पुरुषांना संवेदनशीलता, समजूतदारपणा आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातूनही तोलतात.

सामर्थ्य आणि संवेदनशीलता एकत्र ठेवणे हेच खरे पुरुषत्व आहे. जर समाज पुरुषांना आपल्या भावना व्यक्त करण्याची मोकळीक देईल तर त्यांचा कितीतरी मानसिक त्रास कमी होऊ शकतो, जीवन अधिक सुलभ होऊ शकते.

पुरुष दिनी आपण केवळ पुरुषांची बाह्य शक्ती साजरी न करता त्यांच्या आंतरिक सौंदर्याचे देखील कौतुक करायला हवे आणि म्हणायला हवे It’s okay for men to cry..

Tags:    

Similar News