ठाण्यात महिलांसाठी सार्वजनिक शौचालयात देशातलं 'पिरीयड रूम'!

महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदना असह्य असतात, अशा वेळी महिलांना या ‘पिरीयड रूम’चा लाभ होणार आहे.

Update: 2021-01-16 09:23 GMT

मासिक पाळीचा काळ महिलांसाठी सर्वात कठीण काळ असतो. मासिक पाळी दरम्यान योनी मार्गातून होणारा रक्तस्त्राव त्याचबरोबर पोटदुखी आणि कंबरदुखी या काही वेळा असह्य असतात. अशात काम करणाऱ्या महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र हा त्रास कमी व्हावा यासाठी ठाण्यात एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.

ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील शांती नगर झोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक शौचालयांमध्ये 'पिरीयड रूम'ची व्यवस्था करण्यात आली आहे. मासिक पाळी दरम्यान महिलांचा त्रास कमी व्हावा, तसेच योनी मार्गाची स्वच्छता राखता यावी यासाठी या 'पिरीयड रूम' च्या माध्यमातून महिलांना विशेष सुविधा देण्यात आल्या आहे.


या 'पिरीयड रूम'मध्ये जेट स्प्रे, टॉयलेट रोल होल्डर, साबण, साफ पाणी आणि कचरा कुंडी या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मासिक पाळी दरम्यान काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करणारी काही चित्र या 'पिरीयड रूम'च्या बाहेरील भिंतीवर काढण्यात आली आहेत.

ठाण्यातील चाळींमधील छोट्या छोट्या घरांमध्ये राहाणाऱ्या महिलांना मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखणे तसेच स्वतःची काळजी घेणं अवघड जातं. मात्र ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याच बरोबर ठाणे हे महिलांसाठी अशा प्रकारचं 'पिरीयड रूम' सुरू करणारं देशातलं पहिलं ठरलं आहे.

ठाणे महानगरपालिकेने महिलांच्या दृष्टीकोनातून उचलेलं हे पाऊल अत्यंत महत्वाचं आहे. महिलांना अशा प्रकारच्या सुविधा मिळवून देत, त्यांच्या समस्या लक्षात घेत अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवून ठाणे महानगरपालिकेने एक आदर्श निर्माण केला आहे.



Tags:    

Similar News