निरोगी माता, निरोगी बालके... सशक्त राष्ट्र !!

निरोगी माता, निरोगी बालके... सशक्त राष्ट्र !! | MaxWoman | Healthy Mothers, Healthy Children... Strong Nation!!

Update: 2025-09-19 13:16 GMT

१७ सप्टेंबर २०२५ : ८ व्या राष्ट्रीय पोषण माह या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न झाला. या सोहळ्यात सहभागी होत उपस्थित अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. मातांचे, बालकांचे उत्तम आरोग्य व त्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या बहुमोल योगदानाची माहिती सांगणाऱ्या लोककलेचे सादरीकरण पाहून खरोखर अभिमान वाटला.

राज्यात सध्या ५५३ बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून १ लाख १० हजारांहून अधिक अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. येथे ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील सुमारे ५० लाखांहून अधिक बालके, तसेच ४ लाखांपेक्षा अधिक गरोदर महिला व ४ लाखांहून अधिक स्तनदा माता विविध योजनांचा, सेवांचा लाभ घेत आहेत. म्हणजेच एका मोठ्या पिढीचे भविष्य घडविण्याची जबाबदारी अंगणवाडी व्यवस्थेच्या माध्यमातून आपण पार पाडत आहोत.


Delete Edit


राज्यात या अभियानाला आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी मोठे यश मिळत आहे. आपल्या हजारो अंगणवाड्या, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमामुळे माता व बालकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून पोषण ट्रॅकर ॲप, ई-आंगणवाडी आणि स्मार्ट पोषण कार्ड यांसारखे उपक्रम राबवले गेले आहेत, ज्यामुळे कार्य अधिक पारदर्शक आणि परिणामकारक झाले आहे.

पोषण अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राने नेहमीच राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मला सांगण्यास आनंद होत आहे की, २०१८ ते २०२० मध्ये आपण पहिल्या तीन राज्यांमध्ये होतो, २०२१ ते २०२३ या कालावधीत तर महाराष्ट्राने Activities (उपक्रमांच्या संख्येत) आणि Participants (सहभागी लाभार्थी) देशातला पहिला क्रमांक पटकावला. २०२३ मध्ये दुसरा आणि २०२४ मध्ये पुन्हा प्रथम क्रमांक मिळविला, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे. जेव्हा समाज, शासन व स्वयंसेवी संस्था एकत्र काम करतात तेव्हा असे परिवर्तन घडते. आज महाराष्ट्र या अभियानात आघाडीवर आहे, याचे कारण म्हणजे अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, अधिकारी व स्वयंसेवक यांची न थकता केलेली मेहनत आणि जनतेचा सक्रिय सहभाग. येणाऱ्या काळातही आपण या जनआंदोलनाला अधिक बळ देऊ व आपल्या एकत्रित प्रयत्नातून आपण “कुपोषणमुक्त महाराष्ट्र” आणि “सुपोषित भारत” या ध्येयाकडे निश्चितच वाटचाल करू हा निर्धार यावेळी व्यक्त केला.

या सोहळ्यास महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्री. कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:    

Similar News