त्या एका 'किस'मुळे माझं करिअर आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं
कोल्डप्ले 'किस कॅम' प्रकरण : क्रिस्टिन कॅबॉट यांनी सोडलं मौन
जुलै महिन्यात झालेल्या 'कोल्डप्ले'च्या कॉन्सर्टदरम्यान एका 'किस कॅम'च्या व्हिडिओने जगभर खळबळ माजवली होती. या व्हिडिओमध्ये अमेरिकेतील 'ॲस्ट्रोनॉमर' (Astronomer) या टेक कंपनीचे तत्कालीन सीईओ अँडी बायरन आणि कंपनीच्या एचआर (HR) प्रमुख क्रिस्टिन कॅबॉट आक्षेपार्ह स्थितीत कॅमेऱ्यात कैद झाले होते. आता अनेक महिन्यांनी क्रिस्टिन कॅबॉट यांनी प्रथमच यावर भाष्य केले असून, तो क्षण त्यांच्या आयुष्यातील 'एक चुकीचा निर्णय' होता, अशी कबुली दिली आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
जुलै २०२५ मध्ये मॅसॅच्युसेट्समधील जिलेट स्टेडियमवर कोल्डप्लेचा कॉन्सर्ट सुरू होता. गाणे सुरू असताना स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर (Jumbotron) 'किस कॅम' फिरला आणि त्यात अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबॉट एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसले. स्वतःला स्क्रीनवर पाहताच दोघांनीही चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे ते अधिकच चर्चेत आले. खुद्द कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिननेही तेव्हा स्टेजवरून त्यांची गंमत केली होती.
क्रिस्टिन कॅबॉट यांची प्रतिक्रिया:
'द न्यूयॉर्क टाइम्स'शी बोलताना ५३ वर्षीय क्रिस्टिन म्हणाल्या, "तो माझ्या आयुष्यातील अत्यंत चुकीचा निर्णय होता. मी काही प्रमाणात मद्यपान केले होते आणि आपल्या बॉससोबत तसे वागणे ही माझी चूकच होती. मी त्या कृत्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यासाठी माझे करिअरही पणाला लावले."
आयुष्यावर झालेले गंभीर परिणाम:
या घटनेनंतर कंपनीने अंतर्गत चौकशी केली, ज्यामध्ये सीईओ अँडी बायरन यांनी राजीनामा दिला आणि क्रिस्टिन यांनाही आपली नोकरी सोडावी लागली. क्रिस्टिन यांनी सांगितले की, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. इतकेच नाही तर त्यांना आणि त्यांच्या मुलांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. क्रिस्टिन यांच्या मुलांवर याचा खोलवर परिणाम झाला. त्यांना बाहेर पडायला भीती वाटू लागली. या घटनेच्या काही काळानंतर क्रिस्टिन यांनी त्यांच्या पतीपासून घटस्फोट घेण्यासाठीही अर्ज केला आहे.
क्रिस्टिन यांनी स्पष्ट केले की, त्या रात्री पूर्वी त्यांचे आणि अँडी बायरन यांचे कोणतेही शारीरिक संबंध नव्हते, परंतु तो एक क्षण त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. एका मोठ्या पदावर असताना अशा प्रकारे वागणे ही माझी मोठी चूक होती, असेही त्यांनी मान्य केले आहे.