सुट्टीत नक्की भेट द्यावीत अशी पाच सुंदर ठिकाणे
पुण्याजवळच्या या खास ठिकाणी मिळेल निसर्गाची गोडी, इतिहासाची अनुभूती आणि मन:शांतीचा अनुभव – एका दिवसातच सुंदर सुट्टी साजरी करण्यासाठी परफेक्ट.
आजच्या धावपळीच्या आयुष्यात सुट्टी म्हणजे फक्त घरात आराम नाही तर स्वतःशी पुन्हा कनेक्ट होण्याचा आणि निसर्गात श्वास घेण्याची संधी. यासाठी खूप लांब जाण्याची गरज नाही आजूबाजूला अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत जी एका दिवसात आणि कमी खर्चात पाहून होतात. खाली दिलेली ठिकाणंही त्या पैकीच - निसर्ग, कला, इतिहास आणि अनुभवांनी भरलेली.
१) झपुर्झा – कला, शांतता आणि निसर्ग यांचा परफेक्ट संगम
पुण्यापासून अगदी जवळ असलेलं Zapurza Museum of Art & Culture हे गेल्या काही वर्षांत पर्यटनासाठी एक खास आकर्षण बनलं आहे. प्रशस्त परिसर, शांत वातावरण आणि कलेचा आधुनिक व पारंपरिक संगम - हे ठिकाण फक्त पाहण्याचं नाही तर ‘अनुभवण्याचं’ आहे.
इथल्या आर्ट गॅलरीजमध्ये सुंदर इंस्टॉलेशन्स, समकालीन कलाकारांच्या कलाकृती, शिल्पं, पेंटिंग्ज, ओपन-एअर सेटअप्स अशा विविध गोष्टी पाहायला मिळतात.
निसर्गाच्या सान्निध्यात, हिरवाईने नटलेल्या टेकड्यांमध्ये वसलेलं हे ठिकाण ट्रिप साठी एकदम परफेक्ट डे आउट!
२) भुलेश्वर – ऐतिहासिक आणि फोटोजेनिक मंदिर
पुण्याजवळील डोंगररांगांमध्ये वसलेलं भुलेश्वर हे १३व्या शतकातील दगडी मंदिर आजही आपल्या शिल्पकौशल्याने पर्यटकांना मंत्रमुग्ध करतं. उंच डोंगरावर वसलेलं हे मंदिर दूरूनच डोळ्यात भरतं. इथली कोरीव कामं, दगडी शिल्पं आणि प्राचीन वास्तुकला पाहताना आपण नकळत इतिहासाच्या खोल प्रवाहात उतरतो. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी मंदिराभोवती पसरणारा सोनेरी प्रकाश तर विलक्षण मोहक दिसतो.
फोटोग्राफी लव्हर्ससाठी तर हे ठिकाण म्हणजे स्वर्ग!
३) रामदरा – पाण्याकाठी उभं असलेलं अत्यंत शांत, मनमोहक मंदिर
रामदरा हे गेल्या काही वर्षांत ‘इंस्टाग्राम फेमस’ झालेलं एक सुंदर ठिकाण आहे. तलावाच्या काठी वसलेलं मंदिर, हिरवाईने झाकलेला परिसर आणि पाण्यात उमटणारी मंदिराची प्रतिमा संपूर्ण ठिकाणच कलाकृती वाटतं. इथलं वातावरण सकाळी विशेष शांत आणि प्रसन्न असतं. अनेकजण इथे ध्यान, योग, वाचन किंवा शांत फिरण्यासाठी येतात. मंदिरात गणपती, शंकर आणि इतर देवतांची सुंदर मूर्ती आहेत.
हे मंदिर अतिशय रमणीय आहे.
४) Japalouppe Equestrian Centre – घोडेस्वारीचा रोमांचक अनुभव
जपालूप्पे हे ठिकाण सामान्य पिकनिकपेक्षा ‘वेगळं’ काहीतरी करायचं असेल तर नक्कीच निवडण्यासारखं आहे. हे प्रामुख्याने घोड्यांसाठी असलेलं केंद्र आहे, जिथे घोडेस्वारी शिकवली जाते, तसेच घोड्यांच्या देखभाल, ट्रेनिंग, व्यायामाबद्दल मार्गदर्शनही मिळतं. इथे मुलांसाठी ‘किड्स इंटरेक्शन झोन’ आहे, जिथे त्यांची प्राण्यांशी जवळून ओळख होऊ शकते. इथली हिरवाई, शांतता आणि स्वच्छ वातावरण मन अगदी ताजंतवानं करतं.
एक दिवसाचा अॅडव्हेंचर प्लॅन करायचा आहे तर जपालूप्पे परफेक्ट!
५) निघोज – भूगर्भरचना, निसर्ग आणि शांततेचं अनोखं ठिकाण
निघोज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जे प्रामुख्याने आशियातील सर्वात मोठ्या खड्ड्यांसाठी (Potholes) ओळखले जाते, ज्यांना 'रांजणखळगे' म्हणतात. हे खड्डे भीमा नदीच्या पात्रात तयार झाले आहेत आणि निघोज हे ठिकाण पुणे - अहमदनगर रोडवरती आहे. याशिवाय, येथे जागृत समजल्या जाणाऱ्या मळगंगा देवीचे मंदिर देखील आहे, जिथे मोठा यात्रोत्सव साजरा होतो.
भौगोलिक सुंदरतेची अनुभूती घेण्यासाठी हे ठिकाण अगदीच योग्य आहे.
मोठमोठ्या सहलींचा विचार नेहमीच करता येत नाही. पण सुट्टीचा दिवस अर्थपूर्ण, शांत आणि सुंदर बनवायचा असेल तर अशा जवळच्या ठिकाणांना भेट देणं हेच सर्वात उत्तम. झपुर्झा चं आर्ट वर्ल्ड असो, रामदारा ची शांतता असो, जपालूप्पे मधील अॅडव्हेंचर असो किंवा भुलेश्वरचा इतिहास आणि निघोजचे निसर्गसौंदर्य प्रत्येक ठिकाणाची स्वतःची अनोखी ओळख आहे.
या सुट्टीत फोन बाजूला ठेऊन स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि मन:शांतीसाठी ही छोटी पण अर्थपूर्ण भेट जरूर प्लॅन करा