We The Women या कार्यक्रमात जया बच्चन यांनी केलेले एक वक्तव्य - मला माझ्या नातीने लग्न करावं असं वाटत नाही. लग्न ही आता कालबाह्य संस्था झाली आहे” याने सोशल मीडियावर वादळ आले. पण या विधानाकडे केवळ गॉसिप किंवा वाद म्हणून न पाहता, त्यामागचा बदलता सामाजिक दृष्टिकोन समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण हे वाक्य केवळ एका अभिनेत्रीचं मत नाही, तर नव्या पिढीच्या विचारविश्वात सुरू असलेल्या खोल बदलांचा आरसा आहे.
भारतीय समाजात लग्नाला एक विशिष्ट पवित्रता आणि अनिवार्यता जोडली गेली आहे. घर, परंपरा, वंश, सांस्कृतिक मूल्यं या सर्वांचा केंद्रबिंदू म्हणून लग्न पाहिलं जात होतं. अगदी आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न हीच समजूत आहे. त्यामुळे पारंपरिक मूल्यांचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या जया बच्चन यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीकडून लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अनेकांना धक्का देणारं ठरलं. पण आधुनिक भारतातील तरुणाई लग्नाकडे आता ‘जीवनातील आवश्यक टप्पा’ म्हणून नव्हे, तर ‘एक निवड’ म्हणून पाहायला लागली आहे.
आजची पिढी नातं म्हणजे फक्त लग्न असंच मानत नाही. नात्यातील जुळवून घेणं, भावनिक आधार, आर्थिक स्वातंत्र्य, मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व जपण्याचं स्वातंत्र्य या गोष्टींना ते जास्त महत्त्व देत आहेत. आपण आयुष्यात कुणासोबत राहायचं कधी आणि कसं नातं बनवायचं किंवा अजिबातच नातं न बनवता जगायचं या निर्णयात समाजाने हस्तक्षेप करू नये, ही कल्पना आता अधिक सहज स्वीकारली जात आहे. जया बच्चन यांच्या विधानात हाच बदल दिसतो. लग्न न करता जगणं हीसुद्धा तितकीच प्रतिष्ठेची आणि आत्मसन्मानाची निवड असू शकते.
विशेषतः महिलांसाठी हा परिवर्तनाचा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे. कारण लग्नाचा सामाजिक दबाव सर्वाधिक महिलांवरच असतो. “आता वय झालं”, “स्थिर व्हायचं असेल तर लग्न हवं”, “करिअर नंतर होईल”—अशा वाक्यांमध्ये स्त्रियांचं आयुष्य अनेकदा बंदिस्त होतं. आजही शहरांमध्ये करिअर करणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या मुलींनाही लग्नाच्या निर्णयावर स्पष्ट मत मांडणं सोपं नसतं. या पार्श्वभूमीवर ‘लग्न अनिवार्य नाही’ असं जाहीरपणे सांगणं ही वक्तव्यापेक्षा प्रतीकात्मक कृती अधिक ठरते. हा महिलांच्या वैयक्तिक निर्णयांना दिलेला आदर आहे.
इथे आणखी एक महत्त्वाचा पैलू दिसतो मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा बदललेला आवाज. Navya Naveli Nanda स्वतः उद्योजिका आहे, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाबद्दल बोलते. अशा तरुण मुलीच्या मार्गात लग्न हा ‘पुढचा अटळ टप्पा’ म्हणून न पाहता तिच्या करिअर, स्वप्नं आणि जीवनशैलीला प्राधान्य देणं हे प्रगत विचारसरणीचं लक्षण म्हणावं लागेल. जया बच्चन यांनी हेच म्हणालं की नात नातवंडांनी स्वतःच्या मूल्यांनुसार आणि स्वतःच्या वेळेनुसार आयुष्य जगावं.
अर्थात, लग्नाला पूर्णपणे नाकारण्याचा अर्थ कुटुंबव्यवस्थेचा नाकारणे नाही. अनेक लोकांसाठी लग्न अजूनही भावनिक बांधिलकीचं प्रतीक आहे, ज्यात सुरक्षितता, समता आणि आपलेपणाचा अनुभव मिळतो. पण लग्नाचा अर्थ आणि त्याचं महत्त्व सर्वांसाठी सारखंच असेलच असं नाही. दोन्हीही निवडी तितक्याच मान्य आणि सन्माननीय आहेत.
जया बच्चन यांच्या विधानावर टीका करणारेही बरेच होते. काहींना हे विधान समाजात गोंधळ निर्माण करणारं वाटलं; काहींनी ते पारंपरिक मूल्यांना धक्का देणारं म्हटलं. पण यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या समाजात लग्नासारखा मूलभूत विषय अजूनही चर्चा, मतभेद आणि पुनर्विचार यांचा केंद्रबिंदू आहे. हे मतभेद जरी तीव्र असले तरी, चर्चा सुरू राहणं हीच समाजाच्या प्रगततेची खूण आहे. कारण प्रश्न विचारला जातो तेव्हा उत्तरंही बदलायला लागतात.
शेवटी मुद्दा असा आहे की लग्नाचं महत्त्व त्यात सहभागी होणाऱ्या दोन व्यक्तींनी ठरवायचं असतं. ते नातं त्यांना अर्थपूर्ण, सुरक्षित आणि आनंददायी वाटलं तरच त्याची किंमत टिकते. आणि त्याचप्रमाणे ज्यांना लग्न नको असेल त्यांची निवडही तितकीच मानाने स्वीकारली गेली पाहिजे. जया बच्चन यांच्या विधानाने निर्माण झालेल्या चर्चेपलीकडे जाऊन हा विचार लक्षात ठेवणं अधिक आवश्यक आहे. आपण आपल्या मुला-मुलींना केवळ जीवनाचे नियम शिकवतो का? की त्यांच्या निवडींचा आदरही ठेवतो? समाज बदलतो तेव्हा लग्नासारखी संस्था कालबाह्य किंवा आधुनिक होते पण शेवटी माणसाचा स्वातंत्र्याचा हक्कच सर्वात महत्त्वाचा राहतो.