सकाळच्या पुणे-सांगली प्रायव्हेट बसच्या सगळ्यात पुढच्या २ + २ सीटसमोर पाय ठेवायला जास्त जागा असते. त्यातली एक खिडकीची सीट आज मिळाली होती. शेजारी एक पन्नाशीची, कुडता आणि लेगीन घातलेली बाई येऊन बसली. मधल्या पॅसेजच्या पलिकडच्या दोन्ही सीटवर अजून कुणी बसलं नव्हतं.
थोड्याच वेळात एक पन्नाशीच्या जवळपासची, प्लॅस्टिक जरीची, काठापदराची साडी नेसलेली बाई हातात चार महिन्याचं बाळ घेऊन काळजीपूर्वक बसमध्ये चढली. मागून सामान घेऊन एक तरुण, तिचा मुलगा आला. त्याच्यामागून एक जेमतेम विशीची जरीची, काठापदराची साडी नेसलेली, भाबड्या, अल्लड चेहऱ्याची मुलगी चढली. घट्ट एक वेणी, दागिने, जोडवी, हातापायाच्या नखांना छान गर्द गुलाबी नेलपेंट, सुंदर टिकली! तीच त्या बाळाची आई होती. दोघी जणी आमच्या पलीकडच्या सीटवर बसल्या .तिच्या मागून लेंगा घातलेले तिचे वडील मुलीची पिशवी ठेवायला बसमध्ये चढले. पिशवी ठेवून परत उतरले आणि त्या मुलीच्या खिडकीखाली उभे राहिले.
निरखून बघितलं तर त्या गृहस्थांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहताना दिसलं. आत मुलीचे डोळे तुडुंब भरलेले. शेजारी बसलेल्या तिच्या सासूने मुलीच्या वडिलांना हात करत, ’काळजी करू नका, मी काळजी घेतो हिची,’ अश्या अस्सल सांगलीच्या भाषेत, पलिकडे ऐकू न जाणाऱ्या खिडकीतून आतूनच धीर दिला. ते सांगताना ती स्वत:पण डोळ्यात उभं राहिलेलं पाणी पदरानं पुसत होती. या सगळ्यात बसवाल्यांचा सीटा मोजण्याचा घोळ संपत नव्हता.
मुलगी अचानक जागेवरून उठली, त्या बसच्या माणसाला दोन मिनिटं जरा थांबा असं सांगत भरभर खाली उतरली आणि जाऊन वडिलांच्या गळ्यात पडली. दोघांच्या डोळ्यातलं पाणी खळेना. बसमध्ये बसलेल्या सासूचेसुद्धा डोळे पाझरायला लागले. नवरा कसनुसा चेहरा करून उभा ! शेवटी बसच्या माणसानं नवऱ्याला तिला बसमध्ये बोलवायची विनंती केली. त्याने हाक मारल्यावर मोठ्या मुश्किलीनं डबडबल्या डोळ्यांनी मुलगी वर आली. हे सगळं बघणारी माझ्या शेजारची बाईसुद्धा डोळे पुसायला लागली. माझेपण डोळे ओलावले. सासूनं मायेनं सुनेचे डोळे पुसले. असंच असतं गं आपल्या बायकांचं, अश्या अर्थाचे काहीतरी उद्गार काढले आणि बराच वेळ दोघी डोळे पुसत दु:खी चेहऱ्यानं बसून राहिल्या.
४-५ महीने आईच्या घरी बाळंतपण झाल्यावर पहिलटकरीण बाळाला घेऊन सासरी चालली होती. अगदीच पोरसवदा मुलगी होती. वडिलांना जड गेलं असेल तिला सोडताना.
थोड्या वेळानं मुलगी शांत झाली. नवऱ्याकडून मोबाईल घेतला, आईला फोन करून पप्पा घरी पोचले का असं विचारून घेतलं. बाळ आजीच्या मांडीवर झोपलं होतं.
माझ्या शेजारी बसलेल्या बाईंनी मला सांगितलं की त्यापण आपल्या मुलीच्या घरून, मुलीला आणि दोन जुळ्या नातीना सोडून येत होत्या, त्यामुळं त्या वडिलांचं दु:ख बघून त्यांना मुलगी आणि नाती आठवून रडू आलं.
थोड्या वेळानं बाळ उठलं. थोडी किरकिर केली. त्याचं पोट भरलं मग ते इकडं तिकडं मजेत बघायला लागलं.
मुलीनं बाळ दाखवायला आपल्या आईला व्हिडिओ कॉल केला. आई कॉलवर आली आणि तिला जे काही रडू फुटलं ते आवरेच ना ! चार सीट पलिकडे बसलेल्या मलासुद्धा तिनं मांडलेला गहिवर दिसत होता, ऐकू येत होता. बराच वेळ तिला स्वत:ला control च करता येईना. तिचे हुंदकेच संपेनात. इकडे सासूच्या गंगा यमुना सुरू..
शेवटी इतका वेळ लहान वाटणारी, कसानुसा चेहरा करून बसलेली मुलगी अचानक मोठी होऊन आईची समजूत घालायला लागली. ’असं रडून कसं चालेल? आम्ही येत राहू की तिकडं. घर रिकामं वाटत असेल ना ? होणार असं. सवय होईल हळूहळू बघ. सासू म्हणाली, तुम्ही या आता चार दिवसांनी नातीला भेटायला इकडं.’
नवरा तर उगीचच अपराधी चेहरा करून बसला होता. तो म्हणायला लागला, ’त्यांना सांग आई, आज संध्याकाळचीच गाडी पकडून इकडं या म्हणावं.’
असंच बोलता बोलता तिघी बायका शांत झाल्या, बाळाचं कौतुक सुरू झालं , गप्पा, हकीकती एकमेकींना सांगणं सुरू झालं.
तीन चार तासाच्या प्रवासात बाबाच्या लाडक्या मुलीची आईची आई झालेली बघितली. सुनेच्या, तिच्या आईवडिलांच्या वेदनेनं डोळ्यात पाणी आलेली सासू बघितली, आणि कुठल्या कोण बिनओळखीच्या बापाची वेदना समजून डोळे भरून येणारी(शेजारी बसलेली)अनोळखी बाईसुद्धा !
- रंजना बाजी
(साभार – सदर पोस्ट रंजना बाजी यांच्या फेसबुक वॉल वरून घेतली आहे.)