ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे कालवश

Update: 2021-04-19 04:11 GMT

प्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या,पटकथालेखक आणि सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भावे यांचे सोमवारी पुण्यात निधन झाले. भावे यांचं सकाळी सव्वासात वाजता पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात निधन झालं. गेले दोन महिने त्या फुफ्फुसांच्या विकाराने आजारी होत्या. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पण कोरोनाचे नियम आणि परिस्थिती लक्षात घेता कुणीही गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

देवराई, दोघी, दहावी फ, वास्तूपुरूष अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला होता. सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर यांनी मिळून 14 सिनेमे, अनेक शॉर्टफिल्म, दुरदर्शनरील 3 मालिकांच्या निर्मितीचे तसेच दिग्दर्शनाचे काम केले होते. दहावी फ, वास्तुपुरुष, देवराई, बाधा, नितळ, एक कप च्या, हा भारत माझा, संहिता, अस्तु,दोघी, कासव असे त्यांचे अनेक सिनेमे प्रसिद्ध आहेत. या सिनेमांना आणि शॉर्टफिल्मना 3 आंतरराष्ट्रीय, १० राष्ट्रीय, ४० पेक्षा जास्त राज्य पुस्कार मिळाले होते. अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात या सिनेमांचे प्रदर्शनही झाले होते.


Tags:    

Similar News