खार मध्ये नवीन वर्षाच्या रात्री तरूणीची हत्या, काय आहे नेमकं प्रकरण वाचा!

Update: 2021-01-05 10:57 GMT

नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या जान्हवी कुकरेजा (१९) या तरूणीची १ जानेवारीच्या रात्री खार पश्चिमेला असलेल्या भगवती हाईटस् या इमारतीच्या तळमजल्यावर हत्या करण्यात आली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत जान्हवीची तिच्या इतर दोन मैत्रिणींसोबत भांडण झालं होतं.

३१ डिसेंबरच्या रात्री सर्वात आधी श्री जोगधनकर (२२), दिया पडळकर (१८) आणि जान्हवी या दियाच्या घरी भेटल्या. नंतर त्या तिघी मिळून जान्हवीच्या घरी गेल्या आणि तिच्या वडीलांच्या वाढदिवसाचा केक कापला. जान्हवी सहसा कोणत्याच पार्टीला जाणारी नव्हती. ती पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाला तिच्या उच्च शिक्षणासाठी जाणार होती. अशी तिची अनेक स्वप्नं होती.

श्री आणि दियाने विनंती केल्यामुळे जान्हवी त्या दोघींना कंपनी देण्यासाठी भगवती हाईट्समध्ये त्यांच्याच एका मित्राने ठेवलेल्या पार्टीला जायला ती तयार झाली. जान्हवीच्याच इमारतीतून इतर ३ मुलीही त्या पार्टीत होत्या. पार्टीला गेल्यानंतर रात्री सुमारे १.३० च्या आसपास जान्हवीने तिच्या दोन मित्रांना फोन केले. पहिल्या मित्राने जेव्हा फोन उचलला तेव्हा ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली "दिया माझ्यासोबत काही तरी करायचा प्रयत्न करत आहे"

हे ऐकून जान्हवीच्या मित्राने तिला "दिया सोबत जे काही तुझं झालं असेल ते शांतपणे बसून सोडव" असा सल्ला दिला. तर जान्हवीने दुसऱ्या मित्राला केलेला फोन उचलला गेला नाही. पोलीस दोन्ही मित्रांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यानंतर सकाळी ५ च्या सुमारास दियाच्या वडीलांनी जान्हवीच्या आईला फोन करून दिया आणि जान्हवीचा अपघात झाल्याचं सांगितलं, आणि लगेचच खार पोलीस स्टेशन गाठायला सांगितलं. पण सकाळ पर्यंत त्या पार्टीत असलेल्या लोकांना जान्हवीचा खून झाल्याचं माहीत नव्हतं.

जान्हवीच्या बॅग मधून खार पोलीसांना दियाने लिहीलेलं एक पत्र सापडलं आहे. या संपूर्ण प्रकरणात हे पत्र महत्वाचा पुरावा ठरू शकतं. जान्हवीला दुसऱ्या मजल्याच्या जीन्यांवरून धक्का देऊन पाडण्यात आलं किंवा तिला सरपटत खाली आणण्यात आलं आहे. कारण तिचे रक्ताळलेले केस त्या इमारतीच्या जीन्यांवर पोलीसांना मिळाले आहेत.

किंवा दिया सुद्धा जखमी झाली असल्यामुळे श्री, दिया आणि जान्हवी या तिघींचं एका मुलासाठी भांडण झालं असावं आणि भांडणात जान्हवीचा बळी गेला असावा. अशी शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. दिया आणि श्री या दोघींना ताब्यात घेतलं असून त्या पार्टीत उपस्थित असलेल्या इतर डझनभर लोकांची पोलीस चौकशी करत आहेत.

Tags:    

Similar News