सीएए-एनआरसी विरोधात संपूर्ण देशात असंतोष आहे. देशातील असंतोषाच्या प्रत्येक आंदोलनात,प्रत्येक निदर्शनात मोठी संख्या ही महिलांची आहे. जेएनयूपासून ते जामियापर्यंत किंवा अलिगढपासून ते शाहीन बाग हे प्रमुख केंद्र बनले आहे. दिल्लीत शाहीन बाग परिसरात गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरु आहे. याचे पडसाद देशभर पसरत असताना मुंबईतील आग्रीपाडा मुंबईची शाहीन बाग बनली आहे.
या कायद्याविरुद्ध प्रचंड राग आहेच त्याचबरोबर भारतामध्ये विविध सामाजिक-आर्थिक भागाकडे पाहिलं तर स्त्रियांकडे अनेकदा सरकारी कागदांचा अभाव असतो. या सर्वाचा राग या आंदोलनातून बाहेर येत आहे. हातात तिरंगा घेऊन या महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात आवाज उठवून राज्यघटनेच्या रक्षणासाठी हा चंग या महिलांनी बांधला असल्याचं या आंदोलनातून दिसून येते.
सीएए आणि एनआरसीविरोधात मुंबई सिटिझन फोरमच्या पुढाकाराने आग्रीपाडा येथील वायएमसीए मैदानावर शुक्रवारी झालेल्या या आंदोलनाला मोठ्या संख्येने मुस्लिम महिला उपस्थित होत्या.
https://youtu.be/g39yRbz-94g