Home > Entertainment > 'PM Cares फंडाच्या नावाखाली भाजपचा मोठा घोटाळा?', रुपाली चाकणकर

'PM Cares फंडाच्या नावाखाली भाजपचा मोठा घोटाळा?', रुपाली चाकणकर

PM Cares फंडाच्या नावाखाली भाजपचा मोठा घोटाळा?, रुपाली चाकणकर
X

देशात कोरोना व्हायरसच्या संकटकाळात केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांना मदतीचे आव्हान केलं जात आहे. नागरिकही खुल्या हाताने मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, या संकटकाळातही महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते पीएम केअर्स च्या नावाखाली जनतेला मदतीचं आवाहन करुन खुप मोठा घोटाळा करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सदर फंडाची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.



कोरोनाविरोधातील लढ्यात हातभार लावण्यासाठी नागरिकांना राज्य शासनाला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि केंद्र शासनाला मदत करण्यासाठी पीएम केअर्स (PMCares)या संकेतस्थळांवर आपलं योगदान देण्याची व्यवस्था आहे. नागरिक या माध्यामातून मदतही पोहचवत आहेत.

हे ही वाचा...

मात्र, सध्या राज्यातील भाजप नेत्यांकडून पंतप्रधान केअर फंडासाठी मदतीचं आवाहन केलं जात आहे. यासाठी सोशल मीडियावर विशेष मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेत ही नेतेमंडळी त्यांनी PMcares फंडासाठी केलेल्या मदतीचा स्क्रीनशॉट टाकून आपल्या ५ मित्रमंडळींना टॅग करुन त्यांची मदत करावी म्हणून निवड करत आहेत.

(भाजप नेते गिरिश महाजन यांचं ट्वीट)

(भाजप आमदार श्वेता महाले यांचं ट्वीट)

(भाजप खासदार रक्षा खडसे यांचं ट्वीट)

परंतू केंद्र शासनाने जाहिर केलेलं https://www.pmcares.gov.in/en/ आणि भाजप नेत्यांकडून शेअर केलं जात असलेलं संकेतस्थळ http://pmcaresfund.online/ ही दोन्ही वेगळी असल्याचं म्हटलं जात आहे. एकाच फंडासाठी दोन भिन्न संकेतस्थळ निदर्शनास आल्यामुळे दुसऱ्या संकेतस्थळाचा निधी कुठे जातोय अशी शंका रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केली आहे. सद्यस्थितीला राज्यातील भाजप नेत्यांनी प्रसारीत केलेली वेबसाईट बंद असल्याचं निदर्शनास आलं आहे. संबंधित संकेतस्थळावरील देणग्यांचं नेमकं काय झालं हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

याप्रकरणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी स्पष्टीकरण देताना, "भाजप नेत्यांकडून PMCares फंडाची अधिकृत लिंक प्रसारीत केली जात आहे. दोन्ही लिंक या एकच असून तीच लिंक कार्यकर्ते प्रसारीत करत आहेत. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आणि हॉटस्पॉट आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी हे हॉटस्पॉट कमी कसे होतील याची चिंता केली पाहीजे. अधिकाधिक रुग्ण कसे बरे होतील त्यांना या परिस्थितीतून बाहेर कसे काढता येईल याचा विचार आधी करायला हवा." असं मत व्यक्त केलं आहे.

या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी "महाराष्ट्रातील भाबड्या जनतेची दिशाभुल विरोधी पक्षाने करु नये. महाराष्ट्र कदापी आपल्याला माफ करणार नाही" असा इशारा दिला आहे.



Updated : 29 Oct 2020 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top