आता टीव्ही आणि रेडीओवर भरणार शाळा?  

Update: 2020-05-29 16:32 GMT

राज्यात ३१ मे रोजी लॉकडाऊनचा ४ टप्पा संपणार असून अद्यापही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. त्यामुळे येत्या काळातही लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत राज्याची आर्थिक घडीही विस्कटलेली आहे. यातून सावरण्यासाठी उद्योगधंद्यांना अटी आणि शर्थींसह सूट देण्यात येत आहे. मात्र, शैक्षणिक क्षेत्रात अद्यापही कोणताच ठाम निर्णय घेण्यात आला नाही.

हे ही वाचा..

जून महिना आला की लोक उन्हाळाच्या सूट्टीतून परतीच्या लागून शाळा सुरु होण्यापुर्वीच्या तयारीला लागतात. यंदा कोरोनामुळे शाळा प्रत्येकाच्या घरीच भरण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. शाळा सुरु केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. परंतू विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून घरबसल्या टीव्हीवर शिक्षणाचे धडे देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यामातून हा प्रयोग राबवला जाणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला या संदर्भातील पत्र पाठवले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने डिजिटल शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्राथमिक ते माध्यमिक वर्गासाठी एक हजाराहून अधिक तासांचे डिजिटल शिक्षण साहित्य संग्रहित केले आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांवरून दररोज 12 तास, तर ऑल इंडिया रेडिओवरून दोन तास शैक्षणिक अभ्यासक्रमाचे प्रसारण करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. असं वर्षा गायकवाड यांनी पत्रात म्हटलं आहे.

शिक्षण मंडळाने सुरुवातीला ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचा विचार केला होता. पण आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी स्मार्टफोन, इंटरनेट या सुविधांची सोय नसल्यामुळे टेलीव्हिजन आणि रेडीओ च्या माध्यामतून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.