“कर्तव्यदक्ष पुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आपल्यातून गेल्या” – सुप्रिया सुळे

Update: 2020-08-02 01:26 GMT

राज्यातील जनतेला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी लढा देणारे राजेश टोपे यांच्या आईचं आज निधन झालं. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. शारदाबाई टोपे यांच्या निधनाचं वृत्त कळताचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हळहळल्या आहेत. राजेशभैय्या सारखा सुपुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आपल्यातून गेल्या, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहेत.

या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी फेसबूक पोस्ट लिहीली असून, यात त्यांनी “राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांची आजाराशी सुरु असलेली झुंज अखेर संपली. माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. राज्यात कोरोनाचा कहर सुरु झाला तेंव्हा त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले होते.या काळात राजेशभैय्या आईच्या आजारपणाचं दुःख बाजूला ठेवून कर्तव्य बजावण्यासाठी मैदानात ठामपणे उतरले. वडील स्व. अंकुशराव टोपे आणि आई शारदाताई यांची प्रसंगी आपले दुःख बाजूला ठेवून जनसेवेसाठी सर्वस्व झोकून देण्याची शिकवण त्यांनी तंतोतंत अंमलात आणली. दवाखान्यात उपचार घेत असतानाही शारदाताईंनी राजेशभैय्यांना माझ्या आरोग्यापेक्षा राज्याच्या आरोग्याची काळजी घे असंच सांगितलं. आपलं दुःख बाजूला ठेवत कोरोनाच्या संकटात ठामपणे उभा राहून त्याचा सामना करणारा राजेशभैय्या यांच्यासारखा कर्तव्यदक्ष पुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आज आपल्यातून गेल्या. टोपे कुटुंबियांवर झालेला हा आघात सहन करण्याची शक्ती ईश्र्वर त्यांना देवो.भावपूर्ण श्रद्धांजली.” असं म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून पासून शारदाताई टोपे यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. एकीकडे आईची काळजी घेणं आणि दुसरीकडे कोरोनाची लढाई लढणं अशी दुहेरी कसरत गेल्या महिनाभरापासून राजेश टोपे यांची सुरू होती. मात्र काल रात्री उशिरा शारदाताईंची आजाराशी सुरु असलेली झुंज अखेर संपली.

Similar News