माझे विश्व म्हणजे माझी आई ! -अभिनेत्री पूजा चोप्रा

‘मिस इंडिया’चा किताब पटकावला, पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरीही गाठली, बॉलीवुडमध्ये पदार्पणातच ‘कमांडो’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी... अभिनेत्री पूजा चोप्रा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतेय ‘बबलू बॅचलर’ या चित्रपटातून. यानिमित्ताने तिच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी केलेली खास बातचीत...

Update: 2020-03-14 11:52 GMT

येत्या २० मार्च रोजी 'बबलू बॅचलर ' हा कॉमेडी जॉनर असलेला चित्रपट रिलीज होतोय. विनोदाचं उत्तम अंग असलेला अभिनेता शर्मन जोशी बबलूच्या अर्थात मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्या दोन नायिका ह्यात आहेत. एक माजी मिस इंडिया पूजा चोप्रा तर दुसरी सध्या' अगंबाई सासूबाई ' ह्या मालिकेमुळे चर्चेत असलेली तेजश्री प्रधान !

Courtesy : Social Media

२००९ मध्ये पूजा चोप्रा मिस इंडिया ह्या ब्युटी पेजन्टची सन्माननीय मानकरी ठरली. ह्या स्पर्धेत मिस इंडिया हा क्राऊन मिळवल्यानंतर पूजा मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी देखील अंतिम फेरीत आली, पण ह्या स्पर्धेसाठी जोहान्सबर्गला जातांना ती पडली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला! १ महिना तातडीने बेड रेस्ट आवश्यक होते पण त्या वेदनेसह तिने मिस वर्ल्डमध्ये भाग घेतला परंतु पायाला झालेल्या दुखापतीमुळे ती डान्स राऊंडमध्ये भाग घेऊन शकली नाही, तिच्या गुणांची टक्केवारी कमी झाली! असो... गेली काही वर्षे पूजा चोप्रा जाहिरातींमध्ये, फिल्म्स, आणि आता कुठे वेब सिरीजमध्ये अभिनय करण्यात व्यस्त आहे.

Courtesy : Social Media

पूजा चोप्रा म्हणजे मिस इंडिया आणि मिस वर्ल्डची फायनलिस्ट.. जगातील भौतिक ,ऐहिक ,मानसिक आणि अर्थात कौटुंबिक सुखांच्या पायघड्या तिच्यासमोर घातल्या असतील असं माझं मत.. पण सुखवस्तू आणि सुसंस्कृत कुटुंबातही अशोभनीय कृत्यं घडतात तेंव्हा त्याचे पडसाद मनावर अनंत काळ राहतात ! पूजा चोप्राची भेट म्हणूनच सुन्न करणारी ठरली माझ्यासाठी !

 

पूजा , बबलू बॅचलर हा सिनेमा का करावासा वाटला ?'

 

पूजा - अजय राजवानी निर्मित आणि अग्निदेव चॅटर्जी दिग्दर्शित 'बबलू बॅचलर ' हा कॉमेडी -रोमँटिक सिनेमा आहे . माझे सहकलाकार शर्मन जोशी आणि तेजश्री प्रधान आहेत , जे दोघेही उत्तम कलाकार आहेत . हा सिनेमा कंटेम्पर्री देखील आहे असं मला जाणवलं . मला हा सिनेमा जेंव्हा ऑफर झाला तेंव्हा मी कथा आणि माझी व्यक्तिरेखा ऐकून होकार दिला . कथेची नायिका अवंतिका म्हणजे मी पत्रकार असते . लखनऊ विद्यापीठात शिकणारी अवंतिका , उच्य शिक्षण घेण्यासाठी जेंव्हा मुंबईत येते , तेंव्हा तिची साध्या -भोळ्या दिसणाऱ्या बबलूशी (शर्मन जोशी ) भेट होते आणि त्याच्या भोळेपणावर भाळून अवंतिका त्याच्यावर प्रेम करू लागते... त्याच्याशी लग्न करण्याचा निर्धार करते , पण त्याला विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर तिला अपेक्षित नसते आणि ठरलेले लग्न अवंतिका मोडते !

Courtesy : Social Media

आजच्या युगातील आधुनिक विचारसरणीची युवती जशी वागेल तसेच अवंतिका वागली म्हणूनच मला भावली ! अवंतिका बबलूला त्याच्या महत्वकांक्षा -करियरसंबंधी विचारते , आणि बबलू म्हणतो , क्या जरुरत है ? डॅड के पास बहुत पैसा पडा है , मुझे कोई काम करने की जरुरत कहां ?' वडिलांच्या पैशावर भावी आयुष्याचे मनोरे उभारणारा पती अवंतिकाला नको असतो म्हणूनच ती त्या क्षणी आपलं लग्न मोडीत काढून त्याला गुडबाय करते ! मी अवंतिकेच्या जागी असते तर हेच केले असते .. म्हणूनच मला ही भूमिका जवळची वाटली .'

 

'तुझ्या आजवरच्या प्रवासाबद्दल सांग ..'

 

पूजा -' मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला . आई माझी हॉस्पटेलिटी व्यवसायात नोकरी करत होती . मला एक मोठी बहीण -शुभ्रा आहे , तिने एम बी ए केलं असून तो नोकरी करतेय . आईने आम्हां दोन्ही लेकींना नुसते जीवापाड सांभाळलेच नाही तर आमच्या आवडीनिवडीना प्राधान्य दिले . कुठल्याही आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याची मूभा दिली आणि म्हणूनच आम्ही तिच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही . मी शाळेत असो वा मिस वर्ल्डच्या मंचावर माझ्या तोंडी 'ओह ममा ' असं तिचाच उल्लेख -नाव येतं ..माझे आणि माझ्या दिदीचे अवघे विश्व म्हणजे आमची आई आहे !'

 

Courtesy : Social Media

'तुझ्यावर आईचा प्रभाव अधिक आहे हे मान्य पण वडिलांचा उल्लेख केला नाहीस !'

 

पूजा - 'मी माझ्या वडिलांना पाहिलंच नाही , त्यांना कधी भेटू शकले नाहीये ! आई -वडिलांच्या विवाहानंतर त्यांना पहिली मुलगी झाली .. तीच माझी दीदी ! पहिली मुलगी झाली म्हणून वडील खट्टू झाले होते ..मग ३ वर्षांनी माझ्या वेळेस आई गरोदर असतांना बेटा चाहिये , बेटा होगा ! ह्या दडपणाखाली आई होती .. आणि माझा जन्म झाला म्हणजे अर्थातच आईला मुलगी झाली .. वडिलांना त्यांचा क्रोध आवरला नाही , त्यांनी माझं तोंडही पाहिलं नाही ! आईशी त्यांनी भांडण -वादविवाद केलेत , आणि मी २० दिवसांची असतांना ते घर , आम्हांला सोडून कायमचे परांगदा झालेत ! कायमचे ...आजतागायत मला पिता काय असतो हे समजले नाही .. पित्याची माया मी पाहिली नाही .. दोन लहान मुली आणि आपल्या पत्नीला सोडून गेले ते ..आपल्या मागे आपल्या कुटुंबाचे काय झाले हे त्यांनी कधीही पाहण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही .. ! पिता इतका निष्ठूर असू शकतो हा आघात माझ्यावर न कळत्या वयातच झाला ! पित्याच्या प्रेमाला आम्ही मुली पारख्या झालो म्हणून तिने अधिकच माया दिली , शिक्षण दिले .. आम्ही तिघी एक-मेकींच्या श्वास झालोत ... अपने जीवन की हर ख़ुशी , हर दुख ,हर लम्हा मैने और दीदी ने सिर्फ माँ के साथ बाँटा !

 

माझ्या वर्गातील मुली -शिक्षक मला माझ्या वडिलांबद्दल खोचून विचारत, त्यांना मी खोटं सांगत असे . माझे वडील नोकरीनिमित्य दुसऱ्या शहरांत राहतात ! आज काळ बदलला आहे .. पती पत्नी यांचे विभक्त होणे आता सोशल स्टिग्मा नाहीये ! '

Courtesy : Social Media

'तुला आय ए एस ऑफिसर व्हायचं होतं , मग मिस इंडिया आणि पुढे बॉलिवूड व्हाया मॉडेलिंग हा वेगळाच प्रवास कसा केलास ?'

 

पूजा -'मला आय एस ऑफिसर व्हायचं असं मी शालांत परीक्षा देईपर्यंत ठरवलं होतं . . पण पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्याने मला फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घ्यावा असा आग्रह झाला .. आणि नेमका हाच करियरचा टर्निंग पॉईंट ठरला . मिस इंडिया स्पर्धा जिंकली , पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत फायनलिस्ट ठरले पण मी घसरून पडले आणि पाय फ्रॅक्चर झाला , मी डान्स राऊंडमध्ये भाग घेऊ शकले नाही ,माझे गुण त्यामुळे कमी झालेत ! मिस इंडिया जिंकल्याने अनेक जाहिरातीत मला संधी मिळत गेली . आईशी बोलताना मी तिला म्हटलं , बॉलिवूडच्या ऑफर्स , मॉडेलिंग ऑफर्स येत आहेत . हा अनुभव घेऊन पाहते , नाहीतर पुढचं करियर करण्यास मी तयार आहे .. तिने सतत प्रोत्साहन दिलं . अनेक जाहिराती , अनेक सरकारी आणि अन्य कॅम्पेन्स यांचा चेहरा मी झाले . ह्याच दरम्यान 'कमांडो ' हा सिनेमा मला मिळाला . ह्या फिल्मला यश मिळालं , पण यशाचा आलेख चढता राहिला नाही !'

Courtesy : Social Media

'मिस इंडिया असूनही तुला इथे संघर्ष करावा लागला का ?'

 

पूजा - माझी नॉन फिल्मी बॅकग्राऊंड ! आमच्याकडे कुणालाही अभिनय , मॉडेलिंग याच्याबद्दल काहीही ठाऊक नाही ,नव्हतं . मी, दीदी आणि आई , मी कुणाला सल्ला मागावा असं देखील कुणी नव्हतं ! मुळात नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आलेल्या मुलां-मुलींना सहजा -सहजी अभिनयाच्या संधी मिळत नाहीत .. मिळाल्या तर त्यांच्या फिल्म्स हिट व्हाव्या लागतात , तरच पुढच्या सिनेमांसाठी त्यांना दरवाजे उघडे होतात ! 'कमांडो ' हिट ठरला तरी पुढील फिल्म्स चालल्या नाहीत .. कुठल्ये सिनेमे स्वीकारावेत , कुठल्या सिनेमासाठी कॅम्पेन दर्जेदार आहे , उत्तम प्रोडक्शन हाऊस कुठली हे सांगणाराही कुणी नव्हता माझ्या सोबत ! मी फिल्मी वर्तुळातली नसल्याने वारंवार संधी मिळतही नाही , हे सत्य आहे .. मार्गदर्शन करणारे कुणीही नाही गॉडफादर !मेंटॉर फारच दूरची बाब राहिली !

 

शिवाय माझ्या काही नियमांनुसार मी कायम वागले .. माझ्या कामाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ७ ! कुठल्याही फिल्मी पार्टीत मी गेले नाही. बॉलिवूडमध्ये सोशलाईज झाले नाही. भूमिकेची गरज म्हणून चुंबन हल्ली आवश्यक ठरलंय, पण मी ठामपणे नकार देत आले. इरॉटिक फिल्म्स , दृश्य कधीही देणार नाही ह्या तत्वाशी ठाम राहिले. अशा अनेक कारंणामुळे मी जितकी आघाडीवर असायला हवे होते, मी नाही ! अर्थात मी काही साऊथ फिल्म्स केल्यात त्यात माझी चमक दिसून आली ..'

 

'तनुश्री दत्ता ही तुझ्यासारखी मिस इंडिया आहे , पण तिलाही 'मी टू ' ह्या आंदोलनाद्वारे तिच्यावर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल माध्यमासमोर सांगावं लागलं ! तुझा ह्याबाबत काय अनुभव आहे ?'

 

पूजा - 'मी आरंभीपासूनच तत्वाने वागले , राहिले म्हणूनही असले कदाचित , कुणा पुरुष सहकाऱ्याने माझ्याशी कधीही आगळीक केली नाही ! सुदैव माझं ! 'अरे ला कारे ' म्हणायची वेळच निर्माण होऊ दिली नाही ..

मेरे साथ इस मामले में कभी कुछ गलत नहीं हुआ ! '

Courtesy : Social Media

'सध्या तुझे उपक्रम काय चालू आहेत ?'

 

पूजा - 'वडिलांनीच त्यांच्या मुलींना टाकून दिल्यामुळे मी इतकी व्यथित झाले कि मला मला मिळालेली १० हजार युस डॉलर्स सगळी रक्कम मी 'नन्ही कली ' ह्या मुलींच्या संस्थेला दान केली ..मी पुण्यात राहते . कॉलेजमध्ये असल्यापासून ह्या संस्थेत जाऊन अनाथ मुलींना शिकवते. आजही समाजातील मुलींच्या शिक्षणासाठी जे शक्य असेल त्या सगळ्या उपक्रमांसाठी मी हिरीरीने भाग घेते. आजही मी दर वर्षी किमान १२ मुलींच्या शिक्षणाचा खर्च सांभाळते.

अभिनयात म्हणाल तर 'पॉयझन ' ह्या वेब सिरीजचे शूटिंग हल्लीच संपले. एप्रिलमध्ये ह्या शोचे टेलिकास्ट होईल.

 

 

Similar News