'जायकवाडी'च्या काठावरील 'तिचा' रोजचा प्रवास!

म्हणतात पोटाची खळगी माणसाला सर्व काही शिकवून जाते, त्याचप्रमाणे छाया बाई यांनाही याच पोटाच्या खळगीने जायकवाडी धरणाच्या (jayakwadi dam water) पाण्यात आधीच उतरवलं होतं. मात्र आता सुरू झाला होता तो स्वतः बरोबरच मुलांच्या भविष्यासाठीचा लढा, जो आजही सुरू आहे.

Update: 2021-08-22 10:36 GMT

मुंबईतील कोळी महिलांचा मासेविक्रीच्या व्यवसायात प्रभाव पाहायला मिळतो. पण मुंबई बाहेर मराठवाड्यातही मासेमारीच्या व्यवसायात महिला काम करत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून कहार समाज जायकवाडी धरणा च्या (Jayakwadi dam) भागात मासेमारी करून आपली उपजीविका भागवत आहे. धरणात उतरून जाळे लावण्यापासून तर मार्केटमध्ये विक्री करण्यापर्यंत महिलांचा सहभाग पाहायला मिळतो. औरंगाबादच्या जायकवाडी धरणात (Jayakwadi dam) अशीच एक महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोज मरणाच्या दारावरील प्रवास करतेय. पतीच्या मृत्यूनंतर उघड्यावर आलेल्या संसाराला आपल्या जिद्द आणि मेहनतीने पुढे नेणाऱ्या छाया कुचे ( chaya Kuche) ह्या गेल्या कित्येक वर्षांपासून मासे पकडण्याच काम करतायत.


 पैठण येथील जायकवाडी धरणा च्या (Jayakwadi dam) बँक वाटर (jayakwadi dam backwater) परिसरात राहणाऱ्या छाया कुचे ह्या वयाच्या 15 वर्षांपासून मासे पकडण्याच काम करतात. वडिलांनी 15 वर्ष वय झाले नाही ते लग्न करून दिले. सासरी आल्यावर काही दिवस चांगले गेले. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पती प्रमाणेच छाया बाई यांनी सुध्दा धरणात जाऊन मासे पकडण्याचे काम सुरू केले.



 पकडलेले मासे रोजच्या-रोज विकून मिळाले पैसे हेच या कुटुंबाच आर्थिक उत्पन्न. छाया बाई यांचा असाच संसार सुरू असताना पतीचं अचानक निधन झालं.त्यामुळे घरातील एक मुलगी आणि अपंग मुलाची जवाबदारी छाया बाई यांच्या खांद्यावर आली.साधं रहवासी कार्ड नसलेल्या छाया बाई यांना नोकरी किंवा इतर रोजगारच कोणतेही साधन नसल्याने, त्यांनीही पती प्रमाणेच मच्छिमार हा व्यवसाय पुढे करत राहण्याचा निर्णय घेतला.



 म्हणतात पोटाची खळगी माणसाला सर्व काही शिकवून जाते, त्याचप्रमाणे छाया बाई यांनाही याच पोटाच्या खळगीने जायकवाडी धरणाच्या (jayakwadi dam water) पाण्यात आधीच उतरवलं होतं. मात्र आता सुरू झाला होता तो स्वतः बरोबरच मुलांच्या भविष्यासाठीचा लढा, जो आजही सुरू आहे. छाया बाई ह्या रोज संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास चपूच्या साह्याने धरणाच्या 5-6 किलोमीटर आत जाऊन जाळे लावतात. रात्रीतून जाळ्यात अडकलेले मासे आणण्यासाठी पुन्हा सकाळी 6 वाजता त्याच चपूच्या साह्याने धरणात जातात. पाण्यात जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचं छाया बाई सांगतात.



 वारा आल्यास चपू पलटी होण्याचा धोका असतो.अनकेदा जाळ्यात सर्प ही अडकून येतात, तर याच परिसरात मगर सुद्धा अनेकदा दिसून आल्याने तीही भीती मनात असते. एवढं सर्व करून हातात फक्त किलो-दोन किलो मासे येतात. त्यातून दीड-दोनशे रुपये मिळाले म्हणजे खूप झाले, असेही त्या भावनिक होऊन सांगत होत्या.



 तर अनेकदा उत्पन्नपेक्षा मच्छीमारीसाठी लागणाऱ्या वस्तूंचाच खर्चच अधिक होत असते. मासे पकडण्यासाठी लागणारी एक जाळी हजार रुपयाला मिळते.तर प्रत्येक महिन्याला नवीन जाळी आणावे लागते. त्यामुळे बऱ्याचवेळा पैसे नसल्याने उधारीवर पैसे घेऊन जाळी आणावी लागते. पुढे मासे विकून हे उधारीचे पैसे फेडावे लागत असल्याचं छाया बाई सांगतात.



 पतीच्या निधनानंतरही छाया बाई यांनी संघर्ष अर्ध्यावर न सोडता खडतर लढा दिला आहे. नियतीशी दोन हात करण्याच्या निर्णय घेऊन त्यांनी आपला जीवनाचा लढा कायम ठेवण्याची जिद्द ठेवली आहे.यामुळे छाया बाई यांचा हाच लढा इतर महिलांही प्रेरणादायी देणारा आहे.

Tags:    

Similar News